शरद पवारांच्या दुतोंडी कारभारावर फडणवीसांची टीका

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 14, 2022 | 16:40 IST

Fadnavis criticizes Sharad Pawar's double standard : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांचे संपूर्ण राजकारण हे दुतोंडी आहे, अशा स्वरुपाची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Fadnavis criticizes Sharad Pawar's double standard
शरद पवारांच्या दुतोंडी कारभारावर फडणवीसांची टीका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शरद पवारांच्या दुतोंडी कारभारावर फडणवीसांची टीका
  • पवार आणि त्यांच्या पक्षाचे राजकारण हे धर्म पाहून भेद करते
  • स्वतःच्या सोयीचे राजकारण करत सामाजिक सौहार्द बिघडविणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताला कधीही मान्य नव्हते आणि मान्य नसेल

Fadnavis criticizes Sharad Pawar's double standard : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांचे संपूर्ण राजकारण हे दुतोंडी आहे, अशा स्वरुपाची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ट्वीट करून पवारांचे दुतोंडी राजकारण जगजाहीर केले. 

शरद पवार आंबेडकर जयंती साजरी करतात. पण सार्वजनिक जीवनात आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेच्या अगदी विरुद्ध असे वर्तन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला तीव्र विरोध होता. पण या मुद्यावर पवारांची भूमिका वेगळी आहे. शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ३७० हटविण्याला विरोध असल्याचे चित्र आहे. 

पवारांचा द काश्मीर फाइल्स या सिनेमाला असलेला विरोध हा त्यांच्या राजकारणाचाच एक भाग आहे. यामुळे आश्चर्य वाटत नाही. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने कायम धोरण राबविताना आणि राजकारण करताना सामाजिक भेद कसा राहील यावर भर दिल्याचे दिसते; असे फडणवीस म्हणाले.

एरवी कायदा पाळला पाहिजे असे शरद पवार सांगतात. पण त्यांच्याच पक्षाचा सदस्य दाऊद इब्राहीमशी संबंधित असलेल्यांसोबत व्यवहार करतो. ही बाब उघड झाली तरी त्याला मंत्रिमंडळात स्थान कायम आहे. 

पवार आणि त्यांच्या पक्षाचे राजकारण हे धर्म पाहून भेद करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच इशरत जहाँ निष्पाप असल्याचा दावा केला आणि पुढे ती दहशतवादी असल्याचे पुरावे कोर्टासमोर आले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असतानाच मुंबईत आझाद मैदान येथे पोलिसांवर हल्ला झाला. मैदानातील अमर जवान ज्योत तोडण्याचा प्रकार घडला. हा प्रकार केल्याचा आरोप ज्यांच्यावर आहे त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. उलट त्याच आरोपी संघटनेला पोलिसांकडून चांगली वागणूक दिली जात आहे आणि यासाठी गृहखाते हाताळणाऱ्या राष्ट्रवादीकडून आदेश दिले जात आहेत; असा आरोप फडणवीस यांनी केला. 

संविधानात धार्मिक आरक्षणाची तरतूद नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या तयारीत दिसतो. सर्वधर्म समभाव असे म्हणणारेच 'अल्पसंख्यांक ठरवतील की कोण जिंकेल आणि कोण हरेल' अशा स्वरुपाची भाषा करतात. 

हिंदू दहशतवाद हा शब्द वापरणारे नेमके कोण आहेत... वादग्रस्त सच्चर समिती अहवाल अंमलात आणण्याचा आग्रह धरणारे कोण आहेत... असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. 

मुंबईत बारा बॉम्बस्फोट झाले असताना शरद पवार तेरा बॉम्बस्फोट झाले आणि तेरावा स्फोट मुस्लिम बहुल परिसरात झाला असा दावा करत होते. कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा पवारांना ही खोटी माहिती सांगणे एवढे महत्त्वाचे का वाटत होते, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. 

द काश्मीर फाइल्स हा सिनेमा सत्यघटनांवर आधारित आहे. यात नागरिकांवर झालेला अन्याय आणि त्यांच्या वेदना मांडल्या आहेत. हा सिनेमा कोणाला विरोध करण्यासाठी तयार केलेला नाही. मग या  सिनेमामुळे कोणी अस्वस्थ होण्याचे कारण काय आहे. राजकीय गैरसोय होते म्हणून कोणी अस्वस्थ होत आहे का, असा प्रश्न फडणवीस यांनी जाहीरपणे उपस्थित केला. 

स्वतःच्या सोयीचे राजकारण करत सामाजिक सौहार्द बिघडविणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताला कधीही मान्य नव्हते आणि मान्य नसेल; असे फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी