VIDEO: मुंबईत कोविड रुग्णालयातील आग परिचारिकेने विझवली, प्रसंगावधान दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव

Fire at Dahisar Kandarpada Covid19 Hospital: मुंबईतील दहिसर भागात असलेल्या कांदरपाडा आयसीयू केंद्रात लागलेली आग रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वेळीच विझवली. प्रसंगावधान राखत परिचारिकेने आग विझवली.

fire caught in mumbai covid19 hospital
मुंबईत कोविड रुग्णालयातील आग परिचारिकेने विझवली  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई : मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या दहिसर (Dahisar) येथील कांदरपाडा (Kandarpada) परिसरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या कोविड रुग्णालयात (Covid10 Hospital) अचानक आग लागली. यावेळी रुग्णालयातील परिचारिकेने वेळीच प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टाळली आहे. कोरोना बाधित रुग्णआंवर उपचारासाठी दहिसर येथील कांदरपाडा रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी घाबरून न जाता आणि प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. 

दहिसर येथील कांदरपाडा येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी १०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेले सुसज्ज असे अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित आहे. हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संचालन करण्यात येत आहे. या केंद्रात २९ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी २ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास एका रुग्णाच्या शेजारील एचएफएनसी (हाय फ्लो नोझल कॅनूला) यंत्राने अचानक पेट घेतला. त्यावेळी रुग्णाच्या शेजारी असलेल्या अनुपमा तिवारी यांनी हे संयंत्र रुग्णापासून दूर केले आणि त्या यंत्राचा वीजपुरवठा बंद केला. मुंबई महानगरपालिकेने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ अपलोड केला आहे.

या परिचारिकेने आणि इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत केलेल्या कार्याचा सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सदर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी डॉ रवी, वॉर्डबॉय जतीन यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कौतुक केले आहे.

कांदरपाडा येथील या केंद्रावर नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना अग्नीशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देखील नियुक्तीच्यावेळी देण्यात आले आहे. त्याचा उपयोग अशा घटनाप्रसंगी विचलीत न होता कसा करावा याचे उदाहरण या घटनेतून कर्मचाऱ्यांनी समोर ठेवले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी