In Mumbai, Five-storey Building Collapses In Bandra : मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व येथे बेहराम नगर परिसरात पाच मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेकजण दबले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दलाचे पथक आणि रुग्णवाहिका दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरू आहे. एका आठवड्याच्या आत मुंबईत तिसरी मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे मुंबईतील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे.
वांद्रे येथे इमारत कोसळण्याची घटना आज (बुधवार २६ जानेवारी २०२२) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. ही 'लेव्हल २'ची दुर्घटना आहे. अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या, सहा रुग्णवाहिका आणि मदतकार्यासाठीची एक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आहे; अशी माहिती अग्नीशमन दलाने दिली.
याआधी काल (मंगळवार २५ जानेवारी २०२२) मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाडच्या मालवणी भागात तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळला होता. कसाईवाडा येथील प्लॉट ३७ वरील इमारतीचा भाग कोसळून दोन जण किरकोळ जखमी झाले होते. ही दुर्घटना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झाली होती.
मुंबईत शनिवारी २२ जानेवारी २०२२ रोजी ताडदेव परिसरात कमला या २० मजली इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागली. ही आग वेगाने पसरली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातलगांना राज्य शासनाने पाच लाखांची भरपाई तर केंद्र सरकारने दोन लाखांची मदत जाहीर केली होती. तसेच जखमींना केंद्राने प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली होती.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.