फडणवीसांनी कालच दिली आपल्या नव्या बंगल्याची 'हिंट'

मुंबई
Updated Dec 02, 2019 | 15:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भविष्यात कोणता बंगला राहायला मिळणार आहे, याची हिंट कालच्या आपल्या भाषणात दिली होती का हा निव्वळ योगायोग अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

Former Maharashtra CM and Leader of Opposition in Maharashtra Assembly Devendra Fadnavis allotted Sagar bungalow as official residence
फडणवीसांनी कालच दिली आपल्या नव्या बंगल्याची 'हिंट' 

मुंबई :  विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भविष्यात कोणता बंगला राहायला मिळणार आहे, याची हिंट कालच्या आपल्या भाषणात दिली होती का हा निव्वळ योगायोग अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.  मी पुन्हा येईन पुन्हा येईन' वरून सत्ताधारी पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना खूप कोपरखळ्या मारल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देताना एक शेर म्हटला. त्या शेर मध्ये त्यांच्या बंगल्याचे नाव लपलेले होते, अशी चर्चा होत आहे. 

तर पाहू या काय म्हटला होता, देवेंद्र फडणवीस यांनी शेर.. 

मेरा पानी उतरता देखे
मेरे किनारे पे घर मत बसा लेना
मै समंदर हू लौट के वापस आऊंगा 

या शेरमध्ये त्यांनी स्वतःला समंदर म्हणजे समुद्र म्हणजे सागर म्हटले होते. त्यामुळे हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल की त्यांना सामन्य प्रशासन विभागाने विरोधी पक्ष नेते या नात्याने शासकीय निवासस्थान म्हणून 'सागर' हा बंगला देण्यात आला आहे. या संदर्भातील बातमी एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट करून दिली आहे. 

यापूर्वी  महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील आतापर्यंत चार मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आहेत. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चार मंत्र्यांचा समावेश आहे. यातील शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. 

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नव्या सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना रामटेक हा बंगला देण्यात आला आहे. यापूर्वीही भुजबळ हे मंत्री असताना त्यांना हाच बंगला देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना 'रॉयलस्टोन' हा बंगला वाटप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांना 'सेवासदन' हा बंगला वाटप करण्यात आला आहे. 

यात आता शिवसेनेच्या एका आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना अद्याप बंगला वाटप करण्यात आलेला नाही. याता शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, तर काँग्रेस तर्फे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना अद्याप बंगला वाटप करण्यात आला नाही. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यात जाणार की नाही याबाबत त्यांना पदभार स्वीकारल्यानंतर विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला होता की मी जाऊ की नको. तसेच ते म्हणाले, माझ्यासाठी मातोश्री काय आहे तुम्हांला माहिती आहे. पण प्रशासकीय कामासाठी जे जे करावे लागेल ते मी करणार आहे. राज्याचा गाडा हाकण्यासाठी मला वर्षा बंगल्यावर जावे लागले तर मी त्या ठिकाणी जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.  आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला मुक्काम कधी वर्षा बंगल्यावर हलवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी