संभाव्य महाशिवआडीचा फॉर्म्युला ठरला? पण शिवसेनेसमोर आहेत 'या' अटी, उद्धव- अहमद यांच्यात चर्चा 

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 13, 2019 | 13:05 IST

राज्यात राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेसमोर आपला प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. 

maharashtra government formation
संभाव्य महाशिवआडीचा फॉर्म्युला ठरला? पण शिवसेनेसमोर आहेत 'या' अटी, उद्धव- अहमद यांच्यात चर्चा  

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच न सुटल्यानं मंगळवारी अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
  • राज्यात राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेसमोर आपला प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच न सुटल्यानं मंगळवारी अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर आता राज्यात राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता तीनही पक्ष किमान सामायिक कार्यक्रम धोरण आखत असून, एकमेकांसोबत चर्चेच्या वाटाघाटी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातच शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेसमोर आपला प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. 

मंगळवारी रात्री काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर तसंच अटीशर्तीवर चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. 

संभाव्य महाशिवआघाडीचा असा असू शकतो  फॉर्म्युला 

अडीच -अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेना आणि राष्ट्रवादीला, ५ वर्ष उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे असेल. महामंडळासह सर्व मंत्रिपदांचे समसमान वाटप करण्यात येईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 14 मंत्रिपदे देण्यात येतील.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेसमोर काही अटी ठेवल्याची माहिती मिळतंय. शिवसेनेनं भाजपसमोर सत्तावाटप करताना 50-50 चा फॉर्म्युला ठेवला होता. आता अशाचप्रकारचा काही फॉर्म्युला राष्ट्रवादीनं शिवसेनेसमोर ठेवण्यात आल्याचं समजतंय. त्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावावर काय आणि कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा तर नंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादीच मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेपेक्षा आमचे केवळ दोन आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदासाठीचा आमचा दावा चुकीचा नाही, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. 

याआधी काँग्रेस शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण त्यानंतर काँग्रेसची मनधरणी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेसला सरकारमध्ये सहभागी होण्याच आग्रह धरला. जरी काँग्रेसला आता बाहेरून पाठिंबा द्यायचा असेल तरी तो देत येणार नाही. कारण सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला आता थेट सत्तेचं सहभागी व्हावं लागणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना लवकरात लवकर सत्तास्थापनेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. नाहीतर राज्यात मध्यवधी निवडणुकांचीही नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी