Four important decisions of the Cabinet of Maharashtra on saturday 16 july 2022 : मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात आज (शनिवार १६ जुलै २०२२) बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या मंत्रिमंळ बैठकीत महाराष्ट्राशी संबंधित चार महत्त्वाचे निर्णय झाले.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजुरीचे २९ जून २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजुरीचे २९ जून २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार १२.५६ योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले २२.५ टक्के योजनेचे धोरण सुद्धा १२.५ टक्के धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.
नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून ११६० हे. क्षेत्रावर सार्वजनिक खासगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण ११६० हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती. नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.
एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी साठ हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या बारा हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात एक लाख ७४ हजार ९४० कोटी किंमतीचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमातील कलम २१ नुसार शासनाची पूर्वमान्यता घेण्याची तरतूद विचारात घेता महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास आवश्यकतेनुसार साठ हजार कोटी पर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.