FYJC Admissions : आनंदाची बातमी, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 23, 2022 | 10:48 IST

FYJC Admissions : शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.

FYJC Admissions to begin after CBSE results
आनंदाची बातमी, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • FYJC Admissions : आनंदाची बातमी, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा
  • सोमवार २५ जुलै २०२२ पर्यंत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होणार
  • मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) पुणे महानगर प्रदेश (पीएमआर), नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांत अकरावीचे प्रवेश ऑनलाईन

FYJC Admissions : शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. राज्याच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आधीच जाहीर झाला आहे. आता सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवार २५ जुलै २०२२ पर्यंत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

कोटा अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदवता येईल. राज्याच्या बोर्डाच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २२ जुलै २०२२ पर्यंत अर्जाचा भाग दोन म्हणजेच पसंतीची दहा कॉलेज प्राधान्यक्रमाने नोंदविण्याची संधी उपलब्ध होती. नियमित फेरी १ साठी कॉलेज अलॉटमेंट आणि प्रवेश कार्यवाही याचे वेळापत्रक सोमवार २५ जुलै २०२२ पर्यंत जाहीर होणार आहे. ज्यांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले त्यांच्यासाठी भाग १ आणि २ करिता चार ते पाच दिवसांचा कालावधी दिला जाईल. यानंतर प्रवेश फेरी सुरू होणार आहे. 

शिक्षण संचालनालयाने राज्यातील ज्या क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने होतात तिथे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांतील (ज्युनिअर कॉलेज) अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) पुणे महानगर प्रदेश (पीएमआर), नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांत अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होतील. जिथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे अशा सर्व ठिकाणी अर्जाचा भाग १ भरण्याची प्रक्रिया सुरू राहील आणि अर्जाचा भाग २ भरण्याची प्रक्रिया पण सुरू करता येईल. 

पावसाचा यलो अलर्ट

महाराष्ट्रात शनिवार २३ जुलै २०२२ आणि रविवार २४ जुलै २०२२ या दोन दिवशी निवडक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पालघर, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मंगळवार २६ जुलै २०२२ पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पालघर जिल्हा तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा घाट परिसर येथे शनिवार २३ जुलै २०२२ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यात रविवार २४ जुलै २०२२ पासून पावसाचा जोर ओसरल्याचे दिसेल. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात  शनिवार २३ जुलै २०२२ रोजी पावसाची शक्यता नाही. राज्याच्या काही भागांमध्ये शनिवार २३ जुलै २०२२ आणि रविवार २४ जुलै २०२२ या दोन दिवशी ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होईल. ज्या भागांमध्ये पाऊस पडणार नाही पण ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होईल अशा भागांमध्ये वारे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी २५१५ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर २४४९ जण बरे झाले. राज्यात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख २९ हजार ९१० कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ६७ हजार २८० बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ०५१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २८ लाख ३४ हजार ९५७ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख २९ हजार ९१० पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९७ टक्के आहे.

साथीचे आजार

पावसाच्या आगमनासोबतच मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी