fyjc online admission 2022 student should fill form part 1 in time : यंदा दहावीच्या परीक्षेत ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामुळे अकरावी अर्थात एफवायजेसी (FYJC) (फर्स्ट इयर ज्युनिअर कॉलेज) तसेच डिप्लोमा (Diploma) आणि आयटीआय (ITI) यांच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ८३ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे मोठ्या कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस निर्माण होणार आहे. प्रवेशासाठी मागच्यावर्षी प्रमाणेच जागा उपलब्ध आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रांत ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. राज्यातील इतर भागांमध्ये ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया आहे.
प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया ३० मे २०२२ पासून सुरू आहे. मंगळवारपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार असल्याचे वृत्त आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी कॉलेज नोंदणीचे काम सोमवार २० जून २०२२ पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. काही ठिकाणी नव्या कॉलेजांना मान्यता मिळाल्याने, जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशासाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध राहणार आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रांत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस अर्जाचा भाग एक (नाव, पत्ता, जन्मतारीख अशी सर्वसाधारण माहिती) भरता येणार आहे, तर मंगळवारपासून अर्जातील भाग दोन म्हणजेच गुण आणि आवडीच्या कॉलेजांचा पर्याय भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://11thadmission.org.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.
प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया ३० जूनपर्यंत चालणार आहे. प्रवेशासाठी एक लाख जागा आहेत. नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. या प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) प्रसिद्ध केले आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता तपशीलामध्ये स्वत:चा आसनक्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण भरावेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी https://dte.maharashtra.gov.in ही लिंक बघावी.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यंदा सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून एक लाख ४९ हजार २६८ जागांवर प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्याच्या घराजवळील आयटीआयमध्ये दररोज सकाळी १० वाजता मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाईन किंवा आयटीआयमध्ये ऑफलाईन पद्धतीने भरता येईल. मात्र, अर्जात मोबाइल नंबर देणे अनिवार्य आहे. अधिक माहिती https://admission.dvet.gov.in/ वर मिळेल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.