रवी पुजारीला मुंबईत आणले, १४ दिवसांची पोलीस कोठडी

Gangster Ravi Pujari in police custody till March 9 गजाली रेस्टॉरंट येथे २०१६ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी रवी पुजारी ९ मार्च पर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत

Gangster Ravi Pujari in police custody till March 9
रवी पुजारीला मुंबईत आणले, १४ दिवसांची पोलीस कोठडी 

थोडं पण कामाचं

  • रवी पुजारीला मुंबईत आणले, १४ दिवसांची पोलीस कोठडी
  • रवी पुजारी ९ मार्च पर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत
  • मुंबई पोलीस रवी पुजारीची सखोल चौकशी करणार

मुंबईः बांधकाम व्यावसायिक, इतर व्यावसायिक आणि सेलिब्रेटींकडून खंडणी मागितल्यामुळे चर्चेत आलेला कुख्यात गँगगस्टर रवी पुजारी याचा ताबा कर्नाटककडून महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांना मिळाला. यानंतर पोलिसांनी रवी पुजारीला मुंबईच्या कोर्टात सादर करुन त्याची १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. गजाली रेस्टॉरंट येथे २०१६ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी रवी पुजारी ९ मार्च पर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत असेल. या कालावधीत मुंबई पोलीस रवी पुजारीची सखोल चौकशी करतील. (Gangster Ravi Pujari in police custody till March 9)

रवी पुजारी याला मागच्या वर्षी (२०२०) सेनेगल येथे अटक करण्यात आली. भारतातील कर्नाटक पोलिसांनी सेनेगलमधून रवी पुजाराचा ताबा घेतला. बंगळुरूत तो बरेच दिवस तुरुंगात होता. महाराष्ट्रातील गुन्ह्यांसाठी रवी पुजारीची चौकशी करायची असल्यामुळे त्याचा ताबा मिळवण्याकरिता मुंबई पोलीस प्रयत्न करत होते. अखेर रवी पुजारी याचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाला. मुंबईत २०१५च्या एका हत्येप्रकरणी खंडणी विरोधी पथक रवी पुजारीची चौकशी करण्यासाठी तयारी करत आहे. 

रवी पुजारी विरोधात जळपास २०० गुन्ह्यांची नोंद आहे. यातील ९० गुन्हे एकट्या कर्नाटकमधील आहेत. रवी पुजारी विरोधात बंगळुरूत ३९ आणि मंगळुरूत ३६ गुन्हे आहेत. उडीपीत ११, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा, गुजरातमध्ये ७५ गुन्हे तसेच मुंबईत ४९ गुन्हे आहेत. यापैकी २६ प्रकरणांमध्ये रवी पुजारी विरोधात मोक्का अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील अनेक गुन्ह्यांच्या चौकशीसाठी ठिकठिकाणच्या पोलिसांना त्याचा ताबा हवा आहे. 

रवी पुजारी २००९ ते २०१३ या काळात प्रचंड सक्रीय होता. सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना रवी पुजारीने याच काळात धमकावले होते. तसेच त्याने २०१७-१८ मध्येही अनेक सेलिब्रेटींना धमकावले होते. रवी पुजारी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या यांच्यातील लागेबांधे तपासण्यासाठी तसेच अन्य गुन्ह्यांसाठी मुंबई पोलिसांना त्याचा ताबा हवा आहे. रवी पुजारीचा ताबा लवकर मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न सुरू होता.

काही महिन्यांपूर्वी रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक झाली. काही दिवसांतच तिथून जामीन मिळवून तो दक्षिण आफ्रिकेला फरार झाला. अखेर दक्षिण आफ्रिकेत रवी पुजारीला अटक करण्यात आली आणि त्याला तातडीने सेनेगलला हस्तांतरित करण्यात आले. सेनेगलमधून फेब्रुवारी २०२० मध्ये रवी पुजारीला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुजारीची कर्नाटकमध्ये दीर्घ काळ चौकशी झाली. नंतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला. 

रवी पुजारी विरोधात बिल्डर ओमप्रकाश कुकरेजाची हत्या आणि खासदार माजीद मेमन यांच्या हत्येचा प्रयत्न हे दोन गंभीर गुन्हे आहेत. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर रवी पुजारीला अटक करण्यात आली. परदेशातून भारतात आणण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगारांमध्ये अबू सालेम, छोटा राजन, एजाझ लकडावाला पाठोपाठ आता रवी पुजारी याचाही समावेश झाला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणाही काही प्रकरणांमध्ये रवी पुजारीची चौकशी करण्यासाठी उत्सुक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी