Mumbai Ganpati Visarjan: 'गणपतीचं समुद्रात विसर्जन करण्यास बंदी नाही, पण...' मुंबई महापालिकेचं पत्र 

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 12, 2020 | 17:23 IST

Mumbai Ganpati Visarjan: मुंबईत समुद्रात गणपती विसर्जन करता येणार नाही हे सोशल मीडियावर फिरणारं वृत्त चुकीचं असल्याचं म्हणत मुंबई महापालिकेने त्याविषयी आज एक पत्रकच जारी केलं आहे.

Gampati Visarjan
गणपती विसर्जन (फाइल फोटो)  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: मुंबईत दरवर्षीच गणेशाचे आगमन आणि विसर्जन मोठ्या जल्लोषात होते. या मिरवणुका पाहण्यासाठी लाखोचा जनसागर उसळतो. आता यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2020) हा तर अगदी काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. मात्र कोरोना साथीच्या रोगामुळे यंदा हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केलेले आहे. दरम्यान, अद्यापही कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच आहे. त्यामुळे याच थेट परिणाम हा गणेशोत्सवावर झाला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक असा मेसेज व्हायरल होत होता की, यंदा मुंबईत (Mumbai) गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन (Ganpati immersion) समुद्रात करता येणार नाही. यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. कोरोना व्हायरस (Coronavirus) टाळण्यासाठी कुठेही गर्दी होऊ नये असाच प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र, असं असलं तरीही गणपती विसर्जनास समुद्रात परवानगी नाही हे सोशल मीडियावर फिरणारं वृत्त चुकीचं आहे. याबाबत आता मुंबई महापालिकेने (BMC) एक सविस्तर पत्रक काढून माहिती दिली आहे. त्यामुळे भाविकांना समुद्रात गणपती विसर्जन करता येणार आहे. 

मात्र, गणपती विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर यासारख्या गोष्टीही ध्यानात ठेवाव्या लागणार आहेत. मात्र, तरीही मुंबईत जे १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत तिथेच विसर्जन करण्याचे आवाहनही पालिकेने मुंबईकरांना केले आहे. 

दरम्यान, यावेळी पालिकेने हे देखील स्पष्ट केलं आहे की, समुद्र किनाऱ्यापासून एक ते दोन किलो मीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन हे समुद्रात करण्यास हरकत नाही. तर इतरांनी म्हणजेच जे भाविक समुद्रालगत रहात नाहीत अशांनी प्राधान्याने घरच्या-घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. 

पाहा मुंबई महापालिकेने आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे: 

'श्री गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास बंदी नाही'
महापालिकेने १६७ कृत्रिम तलाव निर्माण केले असून विसर्जन तलावात करण्याचे आवाहन 

'कोविड १९' च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती जबाबदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना आणि आवाहन यापूर्वीच पालिकेनेही केले आहे. तथापि, श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आल्याचे वृत्त समाजमाध्यमांत प्रसारित होत आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे आवर्जून नमूद करण्यात येत आहे की, श्री गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी महापालिकेतर्फे घालण्यात आलेली नाही. 'कोविड १९' च्या अनुषंगाने नागरिकांच्या सेवेसाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे बृहन्मुंबई क्षेत्रात १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले असून सामाजिक दुरिकरण राखून कृत्रिम तलावात अधिक प्रमाणात श्री गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहनही करण्यात येत आहे. 

श्री गणेश भक्तांच्या/नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अधिक संख्येने कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. ज्यानुसार आजपर्यंत १६७ कृत्रिम तलाव तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरीही समुद्रात विसर्जन करण्यावर महापालिकेने बंदी घातलेली नाही. हे पुन्हा एकदा नमूद करण्यात येत आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या एक ते दोन किलो मीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन हे समुद्रात करण्यास हरकत नाही. तर इतरांनी म्हणजेच जे भाविक समुद्रालगत रहात नाहीत अशांनी प्राधान्याने घरच्या-घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे; अशी महापालिका प्रशासनाची सूचना आहे. महापालिका प्रशासन व राज्य शासन यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना / आवाहनाचे पालन करावे. त्याचबरोबर कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शारीरिक दुरिकरण, मास्क, सॅनिटायझर वापरुन हा उत्सव पार पाडावा. असे आवाहन पालिकेने वेळोवेळी केलेले आहे. 

 

२२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव 

२२ ऑगस्ट २०२० रोजी गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. त्यानंतर २३ ऑगस्टला दीड दिवसांचे, २६ ऑगस्टला पाच दिवसांचे, २७ ऑगस्टला गौरी-गणपती आणि १ सप्टेंबरला ११ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. यंदा राज्य शासनाने गणपतीच्या उंचीवर देखील मर्यादा आणली आहे. तसेच जास्तीत जास्त मुंबईकरांना कृत्रिम तलावात अथवा घरच्या घरी विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरुन कोरोना रोखण्यास नक्कीच मदत होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी