मुंबई : वाढीव वीज बिलमध्ये सवलत देण्यास राज्य सरकार (Maharashtra Government)ने नकार दिल्यावर मनसेने (MNS) आक्रमक होत राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चा काढला. वाढीव वीज बिल (inflated power bills) कमी करण्याची मागणी करत मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून नागरिकांना आवाहन करत राज ठाकरेंनी म्हटलं काही झालं तरी वाढीव वीज देयकं भरू नका. पाहूयात राज ठाकरेंनी आपल्या पत्रात काय म्हटलं आहे.
राज्य सरकारचे जिल्हा पातळीवरचे सर्वोच्च प्रतिनिधी ह्या नात्याने माझे महाराष्ट्र सैनिक महाविकास आघाडी सरकारला आपणामार्फत हे निवेदन देत आहेत. कोरोनाच्या काळात माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सरकारचे डोफे उघडावे ह्यासाठी रस्त्यावर उतरुन, मोर्चा काढून संघर्ष करायला लागावा हे दुर्दैवी आहे. पण सरकराला आर्जवांची भाषा समजत नाही त्यामुळे आता मोर्च्याच्या भाषेत समजावयाची वेळ आमच्यावर आली आहे.
एप्रिल महिन्यात कडक टाळेबंदीमुळे नागरिकंचं मोठं आर्थिक नुकसान झालं, व्यवसायांना घरघर लागली, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेलं अर्थकारण ह्या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला आणि जनतेचे डोळे पांढरे झाले. एरवी वर्षभराचं वीज देयक जितकं येतं तितक्या विजेची आकारणी केवळ तीन महिन्यांच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली. एप्रिल, मे, जून, महिन्यांत अनेक खाजगी आश्तापनांची कार्यालयं बंद होती पण तरीही त्यांना पण भरभक्कम वीज देयकं पाठवली. पूर्वी राजकीय राजवटीत जिझिया कर लावला जायचा, ह्या सरकारने वीज देयकांतून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट सुरू केली.
कोरोनाचा कठीण काळ आहे हे लक्षात घेऊन आम्ही सरकारच्या बाजूने ठाम उभे राहिलो. पण... हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा 'शॉक' देणार असेल तर मग आम्हाला पण जनतेच्या वतीने सरकारला 'शॉक' द्यावा लागेल. ही असली मनमानी आम्ही खपवून घेणार नाही.
आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे, काही झालं तरी ही वाढीव वीज देयकं भरू नका आणि हा असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांचा संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.