Mumbai: मुंबई: राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबाबत एक वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलं होतं. ज्याबाबत आता त्यांनी एक निवेदन काढून माफी मागितली आहे. यावेळी कोश्यारी यांनी आपल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, 'मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.'
पुढे राज्यापालांनी माफी मागताना असंही म्हटलं की, 'महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरुन राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंत:करणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.'
अधिक वाचा: ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर शिवसैनिक आक्रमक, राज्यपालांना काढला भल्ला मोठा कोल्हापुरी जोडा!
गेल्या दोन दिवसात राज्यपाल कोश्यारी यांच्यावर महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून टिकेचा भडीमार होत होता. असं असताना आता त्यांनी माफी मागून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषत: संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षात मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतूकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरुन राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंत:करणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
२९ जुलै रोजी मुंबईतील अंधेरी येथे एका चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. हा नामकरण सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. तेव्हा भाषण करताना कोश्यारी म्हणाले की, 'कधी-कधी मी इथे मी लोकांना सांगतो की, महाराष्ट्रात (Maharashtra) विशेषत: मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) इथून गुजरातींना (Gujarati) काढून टाका आणि राजस्थानी लोकांना काढून टाका तर तुमच्याकडे काही पैसे उरणारच नाहीत. ही जी राजधानी आहे जी आर्थिक राजधानी (financial capital) म्हणून संबोधली जाते मग ती आर्थिक राजधानी राहणारच नाही.' असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.
अधिक वाचा: राज्यपालांचे हस्ते झालेले चौकाचे नामांतर अनधिकृत?
भगतसिंह कोश्यारी यांच्या याच वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अखेर वाढता विरोध आणि होणारी टीका लक्षात घेऊन राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माफीनामा शेअर करुन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.