Organic Farming : मुंबई : सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांमुळे शेतकरी बांधव समृद्ध होतील त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम इस्कॉनच्या ‘हरी बोल’ उपक्रमाच्या माध्यमातून केले जावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जुहू येथील इस्कॉन सभागृहात ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना’ या उपक्रमाचा शुभारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, जैव विविधता टिकेल तसेच मृदा आरोग्य चांगले राहील असे सांगून नागरिकांनी सेंद्रिय शेतीतील अन्नधान्य, दुग्ध उत्पादने, मध आदी जिन्नस खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. यावेळी इस्कॉनचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, मायापुर येथील इस्कॉन मंदिराचे विश्वस्त ब्रज विलास दास प्रभू, गौरांग दास, याचनीत पुष्करणा, टी सी उपरेती, गोपाळ उपरेती आदी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी इस्कॉन मंदिराला भेट देऊन रासबिहारी भगवान यांची आरती केली.
एकीकडे अत्यंत प्रगत तर दुसरीकडे अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणारी शेती आपल्याला दिसते. हे चित्र बदलायचे असेल तर कृषी विद्यापींठांमधील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ते मातीत अवतरायला हवे. तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची देशाच्या कृषी क्षेत्राची राजधानी म्हणून नवीन ओळख निर्माण करा, असे आवाहन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. ते आज नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, हा देश अनादी काळापासून शेतीप्रधान आहे. इथल्या शेतकऱ्याची भारताचाच नाही तर देशाबाहेरही अन्नदाता म्हणून ओळख आहे. त्यामुळे हा देश सदैव शेतकऱ्यांच्या ऋणात आहे. महाराष्ट्रात शेतीचे नवनवीन प्रयोग होत आहेत. काही प्रयोगांना जी.आय. टॅगिंगही मिळाले आहे. सेंद्रिय शेती व बाजाराच्या मागणीप्रमाणे पीकपद्धतीचा अवलंब केल्याने चारपटीने उत्पन्नात वाढ झाल्याची, शेतीमाल अमेरिका, ब्रिटन सारख्या देशात प्रत्यक्ष निर्यात झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत. एवढच नाही तर हे प्रयोग पाहण्यासाठी उत्तराखंड येथील शेतकऱ्यांनाही आपण आमंत्रित केल्याचे यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले. उद्योगांनी इथल्या गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी आपल्यासोबतचे अनुभव, ज्ञान इतर शेतकरी बांधवांना द्यायला हवे. आपल्यासोबत इतरांनाही पुढे नेत घरात जसे नव्या जन्माचा आनंद आपण घेतो तसा आनंदोत्सव अनुभवावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.