Bhagat Singh Koshyari: 'राज्यपाल कोश्यारी अजगरासारखे सुस्त पडलेले असतात...' उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली 'ती' सल

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 30, 2022 | 17:19 IST

Uddhav Thackerays criticism of Bhagat Singh Koshyari: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर तुफान टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी कोश्यारींना सुस्त अजगर म्हणत जहरी टीकेची बाण सोडले आहेत.

governor koshyari is sometimes lethargic like a python uddhav thackerays criticism of bhagat singh koshyari
'राज्यपाल कोश्यारी अजगरासारखे सुस्त पडलेले असतात...' (फाइल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबतची सल उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली
  • १२ आमदार नियुक्त न केल्याची सल उद्धव ठाकरेंच्या मनात
  • उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना दिली अजगराची उपमा

मुंबई: महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर चौफेर टीका केली आहे. पण याचवेळी गेले अनेक दिवस एक सल जी उद्धव ठाकरेंच्या मनात होती ती त्यांनी आता खुलेपणाने बोलून दाखवली आहे. एवढंच नव्हे तर राज्यपाल कोश्यारी यांना सुस्त पडलेल्या अजगराची उपमा देत त्यांच्यावर बोचरी टीका देखील केली आहे. (governor koshyari is sometimes lethargic like a python uddhav thackerays criticism of bhagat singh koshyari)

उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजच्या (३० जुलै) पत्रकार परिषदेत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर यथेच्छ टीका केली. आतापर्यंत मुख्यमंत्री असल्याने उद्धव ठाकरे यांना राज्यपालांवर थेट टीका करता येत नव्हती. मात्र, आता कोणतंच संविधानिक पद नसल्याने उद्धव ठाकरेंनी आपल्या मनात असणारा सर्व संताप व्यक्त केला. याचवेळी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी कोश्यारींना बरंच काही सुनावलं आहे.

अधिक वाचा: Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांचा इतिहास, वाचा आजवरची विधानं

उद्धव ठाकरेंनी नेमकी काय केली टीका?

'काही वेळेला आपले राज्यपाल महोदय हे तत्परतेने हलताना दिसतात तर काही ठिकाणी मात्र अजगरासारखे सुस्त पडलेले असतात. याचा प्रत्यय आपल्याला आला असेल. गेले जवळपास दोन वर्ष राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागा भरण्यासाठी त्यांना काही इंटरेस्ट आहे असं काही वाटलं नाही.' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

'या निमित्ताने जरी तो आजचा विषय नसला.. तरीही राज्यपाल महोदयांना त्यांनी नेमलेले सदस्य विधानपरिषदेत गरजेचे वाटत नसतील तर तसं त्यांनी राष्ट्रपतींना कळवायला पाहिजे की, यापुढे राज्यपाल नियुक्त सदस्य आपण तिकडे नेमूच नये. अशी एकदाच काय ती तरतूद त्यांनी केली पाहिजे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गेली दोन वर्ष त्यांच्या मनात जी सल होती ती बोलून दाखवली.

अधिक वाचा: 'कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा', ठाकरेंची जहरी टीका

'एक तर त्यांनी सदस्य नेमायला हवे होते किंवा त्याची तेवढी आवश्यकता नसेल तर तसं त्यांनी कळवून ते बंद करायला पाहिजे होतं.' 

'मात्र, आज त्यांनी जो कहर केला असेल त्यांची भाषणं कोण लिहून देतं याची मला कल्पना नाही. म्हणजे त्यांची भाषणं मुंबईतून येतात की, दिल्लीतून येतात हाही एक संशोधनाचा विषय आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. 

शेवटपर्यंत राज्यपालांनी आमदार नियुक्त केलेच नाही

ठाकरे सरकार अस्तित्वात असताना त्यांनी साधारण दोन वर्षापूर्वी मंत्रिमंडळात निर्णय घेऊन १२ सदस्यांची नावं ही राज्यपाल कोश्यारींकडे पाठवली होती. ही नावं राज्यपालांनी विधानपरिषदेवर आमदार नियुक्त करण्यासाठी पाठवली होती. मात्र, भगतसिंह कोश्यारी यांनी शेवटपर्यंत मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला मंजुरीच दिली नाही. 

अधिक वाचा: 'मुख्यमंत्री शिंदे दिल्ली पुढे किती झुकताय?'

याबाबत कोर्टाने राज्यपाल आणि ठाकरे सरकारने सामंजस्याने निर्णय घ्यावा असा सल्ला दिला होता. कारण आमदार नियुक्तीचा प्रश्न हा राज्यपालांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे कोर्ट राज्यापालांना निर्देश देऊ शकत नव्हतं. मात्र, कोर्टाने सल्ला देऊन देखील कोश्यारींनी त्याकडे कानाडोळा करत ठाकरे सरकारने दिलेली यादी वेटिंग लिस्टवरच ठेवली. अखेर ठाकरेंचं सरकार कोसळलं पण विधानपरिषदेचे आमदार त्यांनी शेवटपर्यंत काही नेमलेच नाही. 

हीच सल उद्धव ठाकरे यांच्या मनात कायम होती आणि तीच त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलूनही दाखवली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी