महाराष्ट्राचे राज्यपाल नंबर वन, महात्मा गांधींवरील पत्रलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक

Governor Koshyari won first prize महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पत्रलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्राचे राज्यपाल नंबर वन!
  • महात्मा गांधींच्या जयंती निमित्त झालेल्या पत्रलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक
  • तब्बल ८० हजार स्पर्धकांमधून पटकावला प्रथम क्रमांक

मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पत्रलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाने “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आंतरदेशीय पत्र प्रवर्गात (inland letter card category) राज्यपालांना राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक पी सी जगताप व सहायक अधीक्षक एस डी खरात यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना प्रथम पुरस्काराचा २५ हजार रुपयांचा  धनादेश (चेक) सुपुर्द केला. 

“प्रिय बापू आप अमर है” या विषयावर पत्रलेखन

“प्रिय बापू आप अमर है” (Dear Bapu, you are immortal) या विषयावरील या पत्रलेखन स्पर्धेत लिफाफा व “आंतरदेशीय पत्र” या दोन प्रवर्गात स्पर्धा झाली. स्पर्धेत ८०,००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती डाकसेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय डाक विभागाच्या वतीने मुंबईपेक्स या दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते. या प्रसंगी बोलताना राज्यपालांनी पत्र लेखन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल डाक विभागाचे कौतुक केले होते, तसेच आपण स्वतः स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. जाहीर केल्याप्रमाणे राज्यपालांनी आंतरदेशीय पत्रावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर निबंध लिहून स्पर्धेत पाठवला होता. राज्यपालांनी हिंदी भाषेत पत्र लिहिले होते. 

स्पर्धेसाठी दोन गट होते. पहिल्या गटात १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना पत्र लेखनाची संधी होती तर दुसऱ्या गटात १८ पेक्षा जास्त वयाच्या सज्ञान व्यक्तींना सहभागी होण्याची संधी होती. राज्यपालांनी दुसऱ्या गटात आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळवले. 

राज्यपालांची राजकीय कारकिर्द

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अनेक विषयांत रुची आहे. आगरा विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयांत आचार्य उपाधी मिळवणाऱ्या कोश्यारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुरुवात केली. त्यांना १९७७ मध्ये आपत्काळाला विरोध केला म्हणून काही काळ जेलमध्ये दिवस काढावे लागले. पुढे ते भाजपचे पूर्ण वेळ कार्यकर्ता झाले. राजकारणात अनेक वर्ष उत्तम कामगिरी केल्यामुळे भाजपने त्यांना २००० मध्ये उत्तरांचल (आता उत्तराखंड) राज्याचे ऊर्जा, सिंचन, विधी व न्याय मंत्री म्हणून नियुक्त केले. नंतर ३० ऑक्टोबर २००१ रोजी ते उत्तरांचलचे मुख्यमंत्री झाले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांनी १ मार्च २००२ रोजी पदाचा राजीनामा दिला होता. नंतर ते राज्याचे विरोधी पक्षनेते झाले. कोश्यारी राज्य भाजपचे २००५ ते  २००७ या काळात अध्यक्ष या नात्याने नेतृत्व करत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाजपला पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जिंकणे शक्य झाले. मात्र तोपर्यंत नव्या जबाबदाऱ्यांसाठी कोश्यारी यांचा विचार सुरू झाला होता. त्यामुळे उत्तराखंडमध्ये विजयानंतर कोश्यारी यांच्याऐवजी भाजपने मेजर जनरल भुवन चंद्र खंडुरी यांना मुख्यमंत्री केले. कोश्यारी २००८ ते २०१४ या काळात राज्यसभा खासदार आणि २०१४ ते २०१९  या काळात नैनिताल लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नंतर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. कोश्यारी यांनी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी शपथ घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल पद स्वीकारले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी