School Reopen: मुंबई : राज्यातील कोरोनाची (Corona) तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा (School)- महाविद्यालये (Colleges) सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक (Academic) नुकसान होऊ नये, यासाठी परत शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
शिक्षणतज्ज्ञ तसेच विद्यार्थी-पालकांचा दबाव आणि राज्यातील कोरोनाची नियंत्रित स्थिती यांचा विचार करून येत्या सोमवारपासून शाळा पूर्ववत सुरू करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. या प्रस्तावास मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे सूत्रांनी सांगितले. शाळा किंवा महाविद्यालय सुरू करताना स्थानिक कोरोना परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांवर मुख्य जबाबदारी असेल.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने शाळा बंद केल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन वर्ग भरवण्यात येऊ लागली होती. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती. कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना म्हणजेच लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. शाळांमध्ये पात्र मुलांच्या लसीकरणावर भर देतानाच कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरू होत्या. मात्र ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून केवळ इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच स्तरांतून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा- महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असून त्याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यातील कोरोनाचा संसर्ग आता राज्यभरात विस्तारला असला तरी त्याची तीव्रता अधिक नाही. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या अजूनही नियंत्रित असून राज्यात लसीकरणाचाही वेग वाढला आहे. त्यामुळे पु्न्हा एकदा शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.