मुंबईतील जीएसटी अधिकाऱ्याची ३०व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

मुंबई
Updated May 14, 2019 | 11:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

GST superintendent suicide: मुंबईतील कफ परेड या उच्चभ्रू परिसरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे एका जीएसटी निरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

suicide_thinkstock
मुंबईतील जीएसटी अधिकाऱ्याची ३०व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Thinkstock

मुंबई: मुंबईत एका जीएसटी निरीक्षकाने इमारतीच्या ३०व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून उडी मरून या जीएसटी निरीक्षकाने आत्महत्या केली. या वर्षीय अधिकाऱ्याचे नाव हरेंद्र कापडिया असे असल्याचं समजतं आहे. काल (सोमवार) त्यांनी आत्महत्या केली. सध्या याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपास देखील सुरु केला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरसारख्या इमारतीजवळ असा प्रकार घडल्याने येथील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

पोलिसांनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असं आढळून आलं आहे की, हरेंद्र कपाडिया हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. या आजारपणाला ते खूपच कंटाळले होते. अखेर याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काल संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान त्यांनी इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली. जखमी अवस्थेतच त्यांना जवळच्यारुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, आजारपणामुळे कापडिया हे तब्बल ३ महिने सुट्टीवर होते. काही दिवसांपूर्वीच ते पुन्हा एकदा कामावर रुजू झाले होते. पण तरीही त्यांना पूर्णत: स्वस्थ वाटत नव्हतं. याच नैराश्यातून काल त्यांनी आपलं कार्यालय असलेल्या इमारतीवरुन उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासही सुरु केला आहे. पण एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे स्वत:चं आयुष्य संपवल्याने त्यांच्या सहकाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

जीएसटी निरिक्षक हरेंद्र कापडिया यांनी आत्महत्या का केली असावी याबाबत सुरुवातीला अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर पोलीस तपासात त्यांनी आजारपणाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र तरीही या घटनेसंबंधी पोलीस सध्या वेगवेगळ्या पैलूद्वारे तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी