gunratna sadavarte arrest by mumbai police under section 120 B and 353 : मुंबई : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. गावदेवी पोलीस ठाण्याने कलम १२० ब आणि ३५३ अंतर्गत कारवाई केली.
मुंबईत शुक्रवार ८ एप्रिल २०२२ रोजी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्याबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी बंगल्याच्या दिशेने काही आंदोलकांनी चपला आणि दगड भिरकावले होते. या आंदोलनाला चिथावणी दिल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर होत आहे. सदावर्ते यांनी चिथावणी देणारे भाषण केल्यानंतर शरद पवार यांच्या बंगल्याच्या दिशेने चपला आणि दगड भिरकावून घोषणाबाजी करण्यात आली; असा आरोप होत आहे. याच प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली.
पोलीस ठाण्यात बसवून दीड तास चौकशी करून नंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली. सदावर्ते यांनी अटक होण्याआधीच माझी हत्या होऊ शकते, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात माझ्या पत्नीने तक्रार दिली आहे. मला कोणतीही नोटीस न देता पोलिसांकडून बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले, असे सदावर्ते यांनी सांगितले.
एसटी राज्य शासनात विलीन करून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी तसेच थकीत वेतन द्यावे या मागण्यांसाठी मागच्या वर्षी (२०२१) दिवाळीपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे 'गॉडफादर' शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केले.
मुंबईत शरद पवारांच्या बंगल्याजवळ आंदोलक पोहोचल्यामुळे एसटी आंदोलनाचा प्रश्न आणखी गंभीर झाला. याआधी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. कर्मचार्यांनी त्वरित कामावर परतावे. जे कर्मचारी २२ एप्रिल २०२२ नंतर कामावर परत येतील अथवा मुदत संपल्यानंतरही परत येणार नाही अशा सर्वांवर निलंबनाची कारवाई होईल; असे अनिल परब म्हणाले. एसटी महामंडळ तोट्यात असले तरी २२ एप्रिल २०२२ नंतर रिक्त जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याचेही अनिल परब यांनी जाहीर केले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवारांच्या बंगल्याकडे कूच केले.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले. पण आम्हाला हक्काचा पगार वेळेत मिळाला नाही. सरकारच्या इतर विभागांच्या तुलनेत एसटीच्या कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळतो. पण आमच्याकडून कामात कोणतीही तडजोड होत नाही. यामुळे एसटी राज्य शासनात विलीन करून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी तसेच थकीत वेतन द्यावे; अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केली.
बॉलिवूडमधील बड्या कलाकाराच्या मुलाला अटक झाली की काळजी वाटते आणि आमच्या अनेक सहकाऱ्यांनी आत्महत्या केल्या, अनेकांचे जीव गेले तरी त्याची फिकीर नाही; अशी तक्रार करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.