Health Department Exam Paper Leak मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात हेल्थ वर्करची कमतरता जाणवत होती. त्यासाठी शासनाने राज्य सरकारने विविध विभागांत भरती प्रक्रिया राबवण्याचे ठरवले. मात्र ही भरती प्रक्रिया सुरुवातीपासून वादात सापडली. त्यात या परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणाचे धागेदाेरे प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात असल्याचे दिसून आले. या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये डॉक्टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे. (Health Department Exam Paper Leak: Doctors, Teachers, Retired Soldiers Break Health Department Papers, Recruitment Scam Threads in Marathwada and Vidarbha)
राज्यात आरोग्य विभागाची गट ड संवर्गातील भरती जाहीर झाल्यापासून पोर्टलवरील त्रुटी, हॉल तिकिटाचा घोळ आदींमुळे परीक्षेच्या तारखा वारंवार पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली होती. पण परीक्षेचा पेपर फुटल्याने आरोग्य विभागाकडे तक्रारींचा पाऊस पडला. अखेर आरोग्य विभागाच्या वतीनेच त्याची पुणे सायबर पोलिसात तक्रार झाल्यानंतर तपासाला वेग आला. यापूर्वी घोटाळ्यात जालना जिल्ह्यातील ३ तसेच औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एकासह एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात सोमवारी सोमवारी रात्री उशिरा लातूर येथील आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याच्यासह बीड जिल्ह्यातील पाच जणांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता ११ वर गेली आहे.
लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (५०, रा. योगेश्वरीनगरी, अंबाजोगाई, बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (३६, रा. एकात्मता कॉलनी, अंबाजोगाई, बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (३६, रा. तितरवणे, शिरूर कासार, बीड), श्याम महादू म्हस्के (३८, रा. पंचशीलनगर, अंबाजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (५१, रा. श्यामनगर, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
लातूर आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हाच सूत्रधार असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानेच अंबाजोगाई येथील मनोरुग्णालयातील डॉ. संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये व श्याम म्हस्के याच्याकडून पाच लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बडगिरे याने प्रश्नपत्रिका कोठून मिळवली, त्याला कुणी मदत केली व या प्रकरणामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.