आरोग्य मंत्र्यांचं डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र, कोरोना युद्धातील ‘सैनिका’ची उपमा

मुंबई
Updated Apr 01, 2020 | 21:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची अविरत सेवा करण्याचं काम देशातील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी करत आहेत. त्यांच्या सेवेचा आदर करत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक भावनिक पत्र लिहिलंय. जाणून घ्या...

Rajesh Tope
आरोग्यमंत्री टोपेंचं डॉक्टर्स,कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरससोबत अविरत लढा देत असलेल्या डॉक्टर्स, नर्स आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार
  • भावनिक पत्र लिहित, कोरोना युद्धातील सैनिकांची दिली उपमा
  • सर्व कर्मचारी, डॉक्टरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि काही सूचना असल्यास द्याव्यात असं राजेश टोपेंचं आवाहन

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज रुग्णांच्या अविरत सेवेत मग्न असलेल्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानत एक भावनिक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी ‘युद्धातील आघाडीचे सैनिक’ अशी उपमा डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांना दिलीय. तुमच्या तत्पर सेवेमुळं आणि अथक प्रयत्नांमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

‘कोरोना’ संक्रमित रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे राजेश टोपे यांनी आभार मानले आहेत आणि त्यांचं अभिनंदनही केलंय. जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शौर्य दाखवत न थकता काम सुरू ठेवल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना मानाचा मुजरा करत असल्याचं पत्रात म्हटलं आहे.

‘कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहात. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळं आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन व आभार!’ असं आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून राजेश टोपेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

कोरोनाचा राज्यात शिरकाव झाला तेव्हापासून आपणच त्याला सामोरं जात आहात. पहिले आपण सर्वांनी या कोरोना व्हायरस विरुद्धच्या युद्धाला सामोरं जाण्यासाठी राज्याचं नेतृत्व केलंय. त्याचप्रमाणं एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटानं बाजी लढवत असतो तसं तुम्ही आतापर्यंत धीरानं कोरोना विरुद्ध लढत आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय असल्याचंही टोपे म्हणाले.

‘तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळं रुग्णांना तर मानसिक बळ मिळतंच पण आम्हालाही त्यामुळं काम करण्याचं पाठबळ आणि प्रोत्साहन मिळतंय. देशातील सर्व जनता आपआपल्या घरात कुटुंबियांसोबत असतांना आपण आपलं कर्तव्य करत आहात. आपल्या कुटुंबियांपासून दूर आहात. अविरत सेवा करत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडील शब्द अपुरे पडत आहेत’, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिलंय.

मी आपणा सर्वांना पुन्हा त्रिवार मानाचा मुजरा करतो, कोरोनाला हरवण्यासाठी आपली लढाई अशीच सुरु ठेवूया. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरुर पोहोचवा, असं आवाहनही शेवटी आरोग्यमंत्र्यांनी या पत्रात केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी