Weather Update : मुंबई : एकीकडे राज्यातील तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असून दुसरीकडे, बऱ्याच ठिकाणी उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. मध्य महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून विदर्भात मात्र पारा वाढतच जात आहे. विदर्भासह उर्वरित राज्यात मात्र कमाल तापमान 42 अंशाच्या पुढे आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. रविवारपासून पश्चिम विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर या भागात पाऊस पडला. सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे ४३.६ अंश सेल्सिअस इतकी झाली.दरम्यान, एप्रिलमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा 39 अंशापासून 46 अंशपर्यत जाईल असा, अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात 11 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण राहील व वाऱ्याचा वेग वाढेल. राज्यात 38 अंश पासून 45 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढेल. त्यामुळे उकाडा अधिक जाणवू लागला आहे. दरम्यान ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच राहणार आहे. विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
दरम्यान आज 11 एप्रिलपर्यंत सांगली, पुणे, कराड उमरगा, देवणी, सोलापूर, आटपाडी, इस्लापूर, रत्नागिरी, चिपळूण, वाई, सातारा या भागात चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, तर तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या मराठवाड्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले असून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामानासह विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळं हातातोंडाशी आलेले गहू पीक क्षणात जमीनदोस्त झाले. तर आडसाली ऊस पीकही वादळाने खाली कोसळला आहे. पुन्हा राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी, शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.