गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी 

मुंबई
Updated Sep 19, 2019 | 11:53 IST

हवामान विभागानं आज मुंबई, रायगड जिल्ह्यासह काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बुधवारी रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. शाळा, महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Mumbai Rain
गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मुंबईसह कोकणातल्या अनेक भागांमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये वीजांच्या कडकाटासह अतिवृष्टीचा होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
  • रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांत घाटमाथ्यावर विखुरलेल्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
  • गेल्या 24 तासांमध्ये राजाच्या अंतर्भागातही सर्वदूर पाऊस पडला असून कोकण आणि गोव्यात मान्सून सक्रिय आहे.

मुंबईः मुंबईसह कोकणातल्या अनेक भागांमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये वीजांच्या कडकाटासह अतिवृष्टीचा होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यासोबतच रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांत घाटमाथ्यावर विखुरलेल्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राजाच्या अंतर्भागातही सर्वदूर पाऊस पडला असून कोकण आणि गोव्यात मान्सून सक्रिय आहे. हा पाऊस येत्या शनिवारपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे. 

भारतीय हवामान विभागानं मुंबईसह कोकणात रेड अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता मुंबई, ठाण्यासह कोकणातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.  विदर्भ, कोकण आणि गोवा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात विखुरलेल्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (65  ते 200 मिमी) पावसाची शक्यता आहे.  

 

 

 

 

बुधवारी देखील मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसानं बुधवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे परिसराला चांगलंच झोडपून काढलं. तसंच मुंबई आणि रायगडमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबरला पालघर, रायगड, जळगाव आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. बुधवारीच कोल्हापुरात अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. सिंधुदुर्ग, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार (65 ते 115 मिमी) पाऊस पडू शकतो.

 

पालघर आणि ठाणे जिल्ह्यात 21 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये 19 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा असून 20 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात 19 आणि 20 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दोन ते तीन दिवस मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला राहणार असल्यानं शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत उत्तर कोकण किनारपट्टीवरील मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. 

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे पश्चिम मध्य दिशेला आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर चक्रीवादळ परिस्थितीमुळे उत्तर कोकण, गुजरातची दक्षिण किनारपट्टी या भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकतं. या दोन्ही ठिकाणच्या घडामोंडीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...