Mumbai Rain : लागोपाठ तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, मुंबईकरांना घरीच थांबण्याच्या सूचना 

Heavy Rain in Mumbai : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थैमान घालणाऱ्या वरूणराजाने काल रात्री जरा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आजही मुंबईच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली आहे.

heavy rains continue in mumbai suburban and thane district
मुंबईकरांना घरीच थांबण्याच्या सूचना   |  फोटो सौजन्य: ANI

Heavy Rain in Mumbai, मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत  (Mumbai) थैमान घालणाऱ्या वरूणराजाने काल रात्री जरा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आजही मुंबईच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली आहे. पुढील २४ तासांत मुंबई आणि  ठाणे  (Thane) परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे मुंबईसह ठाण्यातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका  (BMC) आणि ठाणे महापालिका प्रशासनाने (TMC) मुंबईकर आणि ठाणे परिसरातील नागरिकांना विनाकारण  घराबाहेर पडू नका अशा सूचना वजा इशारा दिला आहे.
 
 गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि  ठाणे सुसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने मुंबई आणि परिसराचे कामकाज ठप्प केलं. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते आणि अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी पाणी शिरले होते.. रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्यानवे  अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांसाठी सुरू असलेली लोकल बंद पडली होती.  मुंबईत काल सखल भागात तीन ते चार फूट पाणी साचलं होतं. काल दुपारच्या सुमारास रेल्वे रुळांवर जवळपास तीन फूट पाणी साचल्यानं  रेल्वे कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या ४५ जणांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मुंबई महापालिका क्षेत्रात वादळी वाऱ्यांच्या फटका बसून १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची नोंद करण्यात आली. ही सर्व झाडे पालिकेच्या उद्यान विभागाने त्वरित हटवली.

मोदींचा उद्धव ठाकरे यांना फोन 

या सर्वांची दखल घेऊन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून या संकटात मी तुमच्यासोबत आहे, असं म्हटलं असून केंद्र सरकारकडून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, आज सकाळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुंबई परिसरातील काही भागात पावसाने पुन्हा बॅटिंग सुरू केली आहे.  मुंबईत दादर, वांद्रे,  कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, सायनसह ठाणे, बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील लो लाइन एरियात पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. आजही मुंबईसह कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने शक्यता आहे.  त्यामुळे  मुंबईत  लो लाइन एरियात पाणी भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  मुंबईत वाहतूक कोंडी होण्याचाही अंदाज असल्याने प्रशासनाने मुंबईकरांना आधीच घरी थांबण्याच्या सूचना केल्या आहेत

असा पाऊस ४५ वर्षात नाही पडला..

हवामान खात्याने नोंद केल्या प्रमाणे काल मुंबईत दिवसभर कोसळलेल्या पावसाची ३२८.२८ मिमी इतकी नोंद झाली.  आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात पडलेला हा सर्वात जास्त पाऊस आहे. गेल्या ४५ वर्षांत ऑगस्ट महिन्यात पडलेला हा विक्रमी पाऊस असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. शिवाय काल मुंबईच्या मरिन लाइन भागात ताशी १०४ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याची नोंद करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेतर्फे सांगण्यात आले. तसेच काही भागात ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते, असंही हवामान खात्याने सांगितलं.

पेडर रोड भागात भिंत कोसळली

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार  पावासमुळे पेडर रोड येथे केम्स कॉर्नरजवळ एक भिंत कोसळलीची माहिती समोर येत आहे. तसेच या भागातील अनेक झाडं उन्मळून पडले आहेत. झाडे आणि मातीचा ढिगारा रस्त्यावरमध्येच येऊन पडल्याने या ठिकाणी वाहतूक ठप्प  झाली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा आणि झाडे दूर करण्यात येत आहेत.

विहार तलाव भरून वाहू लागला 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ दिनांक ०५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी