मुंबईः मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region - MMR) रिक्षा आणि टॅक्सी सेवा आणखी तीन रुपयांनी महाग होणार आहे. यामुळे मुंबई मनपा, संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हा तसेच रायगड जिल्ह्याचा मर्यादीत भाग या ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सी सेवा महागणार आहे. आधी रिक्षाचे किमान भाडे १८ रुपये होते ते आता २१ रुपये झाले तर टॅक्सीचे किमान भाडे २२ रुपये होते ते आता २५ रुपये झाले. भाडेवाढ १ मार्चपासून लागू होणार. (hike in auto fare and taxi fare in mumbai)
मुंबईत सोमवारी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. एमएमआरटीएच्या या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी सेवेच्या दरांचा आढावा घेण्यात आला. यानंतर भाडेवाढ जाहीर करण्यात आली. ही भाडेवाढ १ मार्चपासून लागू होणार आहे.
रिक्षा आणि टॅक्सी चालक आणि मालकांच्या संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली. इंधनाचे वाढलेले दर, देखभाल आणि विम्यासाठी होणारा खर्च यात झालेली वाढ ही कारणे संघटनांनी भाडेवाढीसाठी पुढे केली. मागील पाच वर्षात भाडेवाढ झालेली नाही, असेही संघटनांनी सांगितले. कोरोना संकटामुळे मागच्या वर्षी लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे एप्रिल २०२० ते जून २०२० या तीन महिन्यांत अनेकांनी एकही दिवस रिक्षा, टॅक्सी चालवली नाही. यामुळे कित्येकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. कोरोना संकटामुळे आरोग्य खर्चात वाढ झाली आहे. या बाबीचाही सहानुभूतीने विचार करण्याची मागणी करण्यात आली. अखेर भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सी सेवेच्या किमान भाड्यामध्ये प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली. भाडेवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे २१ रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये झाले. कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत आहे. महाराष्ट्रात ५३ हजार ११३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जाहीर केले. मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत राज्यात रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ जाहीर झाली.
मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९७ रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर ८८ रुपये ६ पैसे आहे. दररोज सकाळी तेल कंपन्या इंधनाचे दर जाहीर करतात. १ फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मुंबईत इंधनाच्या दरात बारा वेळा वाढ झाली. या इंधन दरवाढीपोठापाठ मुंबईकरांवर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
मुंबई महानगर प्रदेशात बहुसंख्य रिक्षा, टॅक्सी सीएनजी अथवा ऑटोगॅसवर (वाहनांसाठीचा LPG) धावतात. मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो ४७ रुपये आणि ९० पैसे तर ऑटोगॅसची किंमत ३७ रुपये आणि ३० पैसे आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी सीएनजी अथवा ऑटोगॅसवर धावतात त्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे फरक पडत नाही. पण रिक्षा, टॅक्सी संघटनेचा भाग असल्यामुळे संबंधित रिक्षा आणि टॅक्सीसाठीही नवे भाडेपत्रक लागू होणार आहे. नव्या भाडेपत्रकामुळे सीएनजी अथवा ऑटोगॅसवर धावणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या मालकांना पेट्रोल, डिझेलवर वाहन चालवणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आर्थिक लाभ होणार आहे.
माजी आयएएस अधिकारी बी. सी. खटुआ (B. C. Khatua Committee) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने नियमित मुदतीने रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेपत्रकाचा आढावा घेण्याची शिफारस केली होती. ही शिफारस राज्य सरकारने मान्य केली. समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेऊन तो जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्रात २०१३च्या निर्णयानुसार २५ वर्ष जुन्या टॅक्सीवर बंदी आहे. यामुळे सर्व प्रीमिअर पद्मिनी टॅक्सी मुंबईतून निवृत्त झाल्या आहेत. याच पद्धतीने मुंबई महानगर प्रदेशातील (Mumbai Metropolitan Region - MMR) रस्त्यांवर १ ऑगस्ट २०२१ पासून १५ वर्ष जुन्या रिक्षांवर (Auto Rickshaw or Rickshaw) बंदी असेल. मुंबई महानगर प्रदेशात १ ऑगस्ट २०२१ पासून १५ वर्ष जुन्या रिक्षांवर बंदी असली तरी उर्वरित महाराष्ट्रात या रिक्षा चालवता येतील. संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांवर १ ऑगस्ट २०२४ पासून १५ वर्ष जुन्या रिक्षांवर बंदी लागू होणार आहे. प्रदूषणाला आळा घालणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे या हेतूने महाराष्ट्राच्या (Maharashtra) परिवहन (Transport) विभागाने (Department) हा निर्णय घेतला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.