मुंबई: 'हिंदुत्व, राष्ट्रवादी की निधी.. नेमकं कोणत्या कारणामुळे शिवसेनेतून बाहेर पडला आहात हे नेमकं ठरवा. गोंधळू नका आणि लोकांनाही गोंधळात टाकू नका.' असा टोमणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
बंडखोर आमदार हे सुरुवातीपासूनच शिवसेना पक्ष सोडण्याबाबत वेगवेगळी कारणं देत आहेत. त्यामुळे आता संजय राऊत यांनी या सर्व आमदारांना कार्यशाळा घेऊन नेमकं कारण निश्चित करावं असा टोला लगावला आहे. तसेच सर्व आमदारांची मानसिक स्थिती काय आहे हे देखील आपण समजू शकतं असं म्हणत बंडखोर आमदारांना चिमटा काढला आहे.
संजय राऊतांची बंडखोर आमदारांवर पुन्हा जोरदार टीका
'कार्यशाळा घ्या आणि काय ते कारण ठरवा...'
'जेव्हा त्यांनी इथून पलायन केलं तेव्हा ते म्हणत होते की, आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलोय. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस निधी देत नव्हता. म्हणून आम्ही बाहेर पडलो. तिसऱ्या वेळेला त्यांनी सांगितलं की, पक्षातले काही लोकं हस्तक्षेप करत होते आमच्या खात्यात म्हणून आम्ही बाहेर पडलो. चौथ्या वेळेल्या ते माझ्याविषयी सांगत आहे. त्यामुळे त्यांनी नक्की पक्ष का सोडला? यासाठी त्यांनी स्वत:ची एक कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमचे आहेत. आजही आम्ही एका नात्याने आम्ही बांधलो गेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा. गोंधळू नका.' असा टोला संजय राऊतांनी लगावला.
'तुम्ही नक्की ठरवा की, तुम्ही पक्ष सोडून का गेले आहात. जर तुम्ही हिंदुत्वासाठी गेला असाल तर २०१४ साली भाजपशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. हिंदुत्व मजबूत असताना देखील ज्या भाजपने आपली युती तोडली तेव्हा यापैकी कोणीच काही बोलले नाही.' असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांच्या भूमिकेबाबत सवाल उपस्थित केला.
'भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून ही वेळ आली'
'२०१९ साली भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून आमच्यावर ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं. आदित्य ठाकरे असतील, पक्षाचे इतर लोकं असतील त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप करुन पक्ष सोडला. त्यामुळे पक्ष सोडण्यामागचं कारण काय यावर त्यांनी एकमत केलं पाहिजे.' असंही संजय राऊत म्हणाले.
अधिक वाचा: शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा
'मी सरकारी कामांमध्ये कधीही ढवळाढवळ केली नाही'
'मी स्वत: कधीही व्यक्तीश: सरकारी कामामध्ये पडलो नाही. संघटनेच्या कामातच मी आहे. सामनाचं काम करतो. पक्षाची भूमिका मांडतो.. मुख्यमंत्र्यांच्या आसपास मला फार कमी पाहिलं असेल. ते देखील संघटनात्मक काम असेल तरच.' असं म्हणत आपण सरकारच्या कामात ढवळाढवळ करत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
'यामुळे माझं जुन्या सहकाऱ्यांना आवाहन आहे की, गोंधळू नका.. तुम्ही का गोंधळला आहात ते आम्हाला माहिती आहे. तुमची मानसिक अवस्था आम्हाला माहिती आहे.' असा चिमटाही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना काढला आहे.
'मोदी साहेबच पवारांची स्वत: स्तुती करतात'
'मोदी साहेबच स्तुती करतात ना पवारांची. या देशातील कोणता नेता आहे जो पवार साहेबांच्या कामाविषयी बोलत नाही... सगळेच बोलतात. बारामतीत येऊन स्वत: मोदी, गडकरी यांच्यासारखे भाजपचेच लोकं कौतुक करतात. ते कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्तरावरील नेत्याचं आम्ही कौतुक करायचं नाही तर मग कोणाचं करायचं?' असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी विचारला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.