मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आता सात दिवस उलटून गेले आहेत. मात्र, तरीही राज्याला अद्यापही नवं मंत्रिमंडळ (Cabinet) मिळू शकलेलं नाही. कारण शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगली खाती मिळावी यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचं समजतं आहे. याचबाबत आज (7 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बैठक होणार असून यामध्ये नेमकं सूत्र आणि खातेवाटप निश्चित केलं जाणार असल्याचं समजतं आहे.
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा होणार आहे. शिंदे गटाला १३ ते १४ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला २५ ते २७ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ४ आमदारांमागे एक मंत्रिपद अशा पद्धतीने शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळाचं सूत्र असणार आहे.
या खातेवाटपात शिंदे गटाकडे नगरविकास, MSRDC ही खाती मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप गृह, अर्थ आणि महसूल ही तगडी खाती आपल्याकडे ठेवणार असल्याचं समजतं आहे.
शिवसेनेतून फुटून शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांचा नेमका काय फायदा होणार?
फक्त ५० आमदार असतानाही भाजपने मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिलं. मात्र, भाजप खाते वाटपात अधिकचा वाटा घेणार असल्याचं चर्चा आहे. यातही अनेक अत्यंत महत्त्वाची खाती ही भाजप आपल्याकडेच ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. अशावेळी शिंदे गटातील आमदारांना नेमकं काय मिळणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
अधिक वाचा: भुमरेंनी सामना कार्यालयात माझ्यासमोर लोटांगण घातलेलं: राऊत
शिंदे गटासोबत शिवसेनेचे एकूण ४० आमदार आहेत. तर शिवसेनेला पाठिंबा देणारे १० आमदार आहेत. त्यापैकी शिंदे वगळता एकूण ९ मंत्री आहेत. अशावेळी या सर्वंनाच मंत्रिपद देणं हे शिंदेंना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे उरलेल्या तीन ते चार आमदारांचीच मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
शिंदे गटात सध्या जे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्या सर्वांची सुरुवातीपासून अशी तक्रार होती की, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व महत्त्वाची खाती ही त्यांच्याकडे ठेवली आहेत. त्यामुळे शिवसेनेवर अन्याय होत आहे. अशावेळी जर आता देखील अत्यंत महत्त्वाची खाती भाजप आपल्याकडे घेणार असेल तर आमदारांच्या या बंडाचा नेमका फायदा काय होणार? असा सवालही विचारला जात आहे.
एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले तरीही सरकार चालवताना त्यांना पूर्णपणे भाजपवर अवलंबून राहावं लागणार आहे. कारण भाजपकडे आमदारांचं सर्वाधिक बळ आहे. अशावेळी शिंदे गटाच्या आमदारांना निधीसाठी भाजपच्याच मंत्र्यांकडे जावं लागणार आहे.
त्यामुळे आता शिंदे गटाला भाजप नेमकी कशी वागणूक देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अन्याय करत असल्याचं म्हणत शिवसेनेच्या ४० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरीही भाजपसोबतच्या सत्तेत त्यांच्या हाती काय लागणार याकडेच आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.