I am not angry with Home Minister Dilip Walse Patil says Chief Minister Uddhav Thackeray : मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. या बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या आहेत; असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रसारमाध्यमांना कळवले आहे. । महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय । मास्क घालणे ऐच्छिक केले
माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत; असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात काही मुद्यांवरून मतभेद आहेत. मुख्यमंत्री राज्याच्या गृहमंत्र्यांवर नाराज आहेत, अशा स्वरुपाचे वृत्त आले होते. पण ही बातमी म्हणजे निव्वळ 'एप्रिल फूल' करणारे वृत्त आहे; अशा स्वरुपाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आता घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात बोलत असल्याच्या काही घटना घडल्या. खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी एका भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयीची नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी महाराष्ट्रात राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे अशा स्वरुपाचे वक्तव्य किर्तीकर यांनी जाहीरपणे केले. किर्तीकर यांच्या पाठोपाठ आमदार तानाजी सावंत यांनीही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांना सत्तेची फळं चाखता येत आहेत. शिवसेनेला लाचारासारखी वागणूक मिळत आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेचा अपमान होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात तसेच सत्तेच्या वाटपात शिवसेनेला दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक मिळत आहे; असे तानाजी सावंत म्हणाले.
शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होण्यास सुरुवात झाली असतानाच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात नाराजीनाट्य सुरू असल्याच्या बातम्या आल्या. भाजपचे नेते पुरावे सादर करून महाविकास आघाडीतील निवडक नेत्यांची कोंडी करत आहेत. याला उत्तर म्हणून गृहमंत्र्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची कोंडी करण्यासाठी कारवाया कराव्या अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा होती. पण गृहमंत्र्यांकडून ही अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत; अशा स्वरुपाचे वृत्त येत होते. पण गृहमंत्री वळसे पाटील यांच्यावर मी नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या बातम्या दिल्या जात आहेत; असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह जगजाहीर होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.