मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केला, त्यांनी एकदाही माझा फोन घेतला नाही: देवेंद्र फडणवीस

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी अनेकदा फोन केला होता पण उद्धव ठाकरेंनी माझा फोन एकदाही घेतला नाही. असं फडणवीस म्हणाले.

i called uddhav thackeray many times, he never took my phone said devendra fadnavis
मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केला, त्यांनी एकदाही माझा फोन घेतला नाही: देवेंद्र फडणवीस  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

 • चर्चा शिवसेनेनी बंद केली, आम्ही चर्चा बंद केली नाही: फडणवीस
 • मी उद्धव ठाकरेंना फोन केले, पण माझे फोन त्यांनी घेतले नाही: फडणवीस
 • देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर गंभीर टीका

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण राजकीय परिस्थितीबाबत आपली भूमिका मांडली. याच पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन न होण्याचं संपूर्ण खापर हे शिवसेनेवरच फोडलं. भाजप चर्चेसाठी तयार होती, पण शिवसेनेनेच चर्चा बंद केली होती. असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी असा थेट आरोप केला आहे की, 'मी स्वत: उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. पण त्यांनी माझा एकही फोन घेतला नाही.' फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र खूप खळबळ माजली आहे. 

'गेल्या पाच वर्षात मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटलो, बऱ्याचदा त्यांच्या घरी गेलो, आमचा फोनवरुन एकमेकांशी संपर्क देखील असायचा. अनेक प्रश्नांवर आम्ही दोघांनी चर्चा करुन मार्गही काढला आहे. पण गेल्या पंधरा दिवसात मी स्वत: उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले, पण त्यांनी माझा एकदाही फोन घेतला नाही. त्यामुळे आमच्याकडून चर्चा बंद झाली नाही तर ती शिवसेनेकडून बंद झाली. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरु केली. दिवसातून तीन-तीन वेळा त्यांनी राष्ट्रवादीशी चर्चा केली. शिवसेनेने आमच्याशी चर्चा केली नाही यांचं दु:ख आम्हाला नाही. पण ज्यांच्याविरुद्ध त्यांनी मतं मागितली त्यांच्याशी चर्चा करायला त्यांना वेळ होता.' असं म्हणत फडणवीस यांनी सगळ्या गोष्टींचं खापर हे शिवसेनेवरच फोडलं.  

पाहा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: 

 1. युती तुटली असं मी बोलणार नाही
 2. निवडणूक निकालाच्या पहिल्या दिवशी जर समसमानची भाषा असती तरी एकदा आपण विचार केला असता 
 3. राज्याच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो
 4. मला विश्वास आहे, येत्या काळात जे सरकार येईल ते भाजपच्याच नेत्रृत्वात सरकार येईल
 5. सरकार बनवण्यासाठी घोडेबाजार करणार नाही
 6. सरकार स्थापन करताना कुठल्याही प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आम्ही करणार नाही
 7. पुन्हा निवडणुका लादणं हे चुकीचे आहे
 8. राज्याला सरकार मिळालं पाहिजे 
 9. वैकल्पिक पर्याय उपलब्ध होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार
 10. दैनंदिन काम मुख्यमंत्री म्हणून करेल मात्र, कुठलीही घोषणा करता येणार नाही 
 11. राजीनामा दिल्यावर राज्यपालांनी मला नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमत्री नेमलं आहे
 12. मित्रपक्षच मोदींवर आणि आमच्यावर टीका करत असताना अशा प्रकारचं सरकार कशाला चालवायचं असं आम्हाला वाटलं होतं
 13. काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांनी जशी टीका केली नाहीये तशी टीका आपल्या मित्र पक्षांनी केल्याने आम्हाला वाईट वाटलं आहे 
 14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मित्रपक्षाकडून टीका होण हे दुर्दैवी
 15. पंतप्रधान मोदींचं नेत्रृत्व सर्वांनीच मान्य केलं आहे
 16. टीका करणाऱ्याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी लक्षात आणून दिलं
 17. केंद्रात आणि राज्यात सरकारसोबत रहायचं आणि त्या पक्षावर टीका करायची हे आम्हाला मान्य नाहीये
 18. आम्ही जोडणारे लोक आहोत तोडणारे नाहीत
 19. दरी त्यांनी वाढवली आहे, आम्ही टीका करणार नाही
 20. उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजुचे लोक बोलत आहेत
 21. भाजपसोबत चर्चा करायची नाही आणि शिवसेनेसोबत चर्चा करायची हे शिवसेनेने अवलंबलेलं धोरण अयोग्य आहे
 22. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ आहे मात्र, आमच्यासोबत चर्चा करण्यास वेळ नाहीये
 23. भाजपने चर्चा थांबवलीच नाही, चर्चा शिवसेनेने थांबवली आहे
 24. मी स्वत: फोन केले मात्र, माझ्या फोनला उत्तर मिळालं नाही
 25. आम्ही शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी सुरुवात केली होती
 26. जो काही गैरसमज झाला त्यावर चर्चेतून तोडगा निघू शकतो मात्र, चर्चाच झाली नाही तर मार्ग निघणार कसा
 27. अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासमोरही अडीच वर्षे मुख्यमंत्री पद अशी कुठलीच चर्चा झाली नव्हती
 28. म्हणून दिवाळी दरम्यान अनौपचारिक चर्चे दरम्यान मी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्यासमोर काहीही चर्चा झाली नव्हती
 29. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा जो काही विषय आहे त्यासंदर्भात माझ्यासमोर कधीही अडीच वर्षांच्या विषयावर निर्णय झाला नव्हता
 30. उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की सत्तेचे सर्व पर्याय खुले आहेत हे ऐकताच आम्हाला धक्का बसला
 31. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या
 32. जितक्या जागा लढल्या त्यापैकी ७० टक्के जागांवर विजय मिळवला
 33. राज्यातील जनतेने लोकसभेतही प्रचंड बहुमत भाजपला दिलं
 34. पाच वर्षांपैकी चार वर्षे दुष्काळाची होती
 35. गेल्या पाच वर्षांत पायाभूतची सुविधांची कामे झाली
 36. सरकार चालवत असताना मित्रपक्षांनी साथ दिली त्याबद्दल त्यांचेही आभार
 37. मुख्यमंत्री पदाच्या काळात प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार
 38. गेली पाच वर्षे राज्याची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल जनतेचे आभार
 39. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला आहे
 40. राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...