'मला युती तोडायची नाही, पण...', आमदारांसमोर उद्धव ठाकरेंचं अतिशय मोठं वक्तव्य

मुंबई
Updated Nov 07, 2019 | 15:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Uddhav Thackeray's Big Statement: 'मातोश्री'वर झालेल्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली आहे. तसंच शिवसेना अद्यापही मुख्यमंत्री पदाबाबत ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे.

i do not want to break the alliance uddhav thackeray's big statement in mlas meeting
'मला युती तोडायची नाही, पण...', आमदारांसमोर उद्धव ठाकरेंचं अतिशय मोठं वक्तव्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मला स्वत:हून युती तोडायची नाही, भाजपने ठरल्याप्रमाणे निर्णय: संजय राऊत
  • उध्दव ठाकरेंनी घेतली पुन्हा एकदा आक्रमक भूमिका
  • शिवसेनेने सत्तास्थापनेचा चेंडू पुन्हा एकदा टोलवला भाजपकडे

मुंबई: शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडतं याकडे भाजपचं लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा करुन उद्धव ठाकरे यांनी असा निर्णय घेतला आहे की, कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मागे हटणार नाही. त्यामुळे शिवसेना आपल्या ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर कायम आहे. आमदारांच्या याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी थेट अशी भूमिका घेतली आहे की, 'अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं ठरलं तरच मला फोन करा.' त्यामुळे शिवसेना आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. 

पाहा उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले:

शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे हे समसमान वाटप या भूमिकेवर ठाम आहेत. याचविषयी आमदारांसोबत बोलताना ते असं म्हणाले की, मला स्वत:हून युती तोडायची नाही. युती तोडण्याचं पाप मला करायचं नाही. त्यामुळे जे काही ठरलं असेल ते सगळं गोडीने व्हावं. समसमान वाटप आधीच ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासह समान वाटप झालं पाहिजे. युती कायम राहावी हीच माझी देखील इच्छा आहे. पण आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो भाजपने घ्यायचा आहे.' असं म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा चेंडू भाजपकडे टोलवला आहे.  

आपण स्वत:हून युती तोडणार नसल्याचं म्हणत आता उद्धव ठाकरे यांनी एका वेगळ्याच चर्चेला तोंड फोडलं आहे. कारण आतापर्यंत सत्तास्थापनेवरुनच शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरु होती. पण आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी थेट युती तुटण्याबद्दल भाष्य केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधील संबंध अतिशय ताणले गेले आहेत. भाजपनेच काय तो निर्णय घ्यावा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निर्णय सोपवला आहे. पण यावेळी देखील उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत ठाम आहेत.  

एकीकडे उद्धव ठाकरेंनी आमदारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली असताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. मात्र, यावेळी भाजपच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेचा कोणताही दावा केला नाही. या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी माहिती दिली की, 'राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी राज्यपालांविषयी चर्चा झाली. यावेळी त्यांच्याशी कायदेशीर प्रक्रियेबाबत देखील चर्चा झाली. सत्ता स्थापनेला वेळ लागत आहे. पण हा गुंता लवकरच सोडविण्यात येईल.' असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी