कल्याण: 'कल्याण शहराचा शहरप्रमुख म्हणून माझी नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मी काही गद्दारी केलेली नाही, त्यामुळे मी काही राजीनामा देणार नाही.' असा पवित्रा कल्याण (Kalyan) पश्चिमचे आमदार (MLA) व शिंदे समर्थक विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी घेतला आहे.
'पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाटले तर या पदावर मला ठेवतील. अन्यथा काढून टाकतील हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असेल.' असंही विश्वनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
शिवसेना पक्षाच्या 40 बंडखोर आमदारांमध्ये सुरुवातीपासूनच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर होते. इतर आमदारांचा बंडखोरीचा प्रवास हा 19 तारखेपासून सुरू झाला असला तरी भोईर यांचा हे 13 जून पासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते.
बंडखोरीनंतर सत्ता स्थापन होताच 21 दिवसांनी आमदार विश्वनाथ भोईर हे आपल्या मतदार संघात परतले आहेत. यानंतर आज (१५ जुलै) त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी आपण आजही शिवसैनिक असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला मिळणारी तुच्छ वागणूक आणि मतदारसंघात काढल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल यासारखी वक्तव्ये केली जात होती. यामुळेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण पाठिंबा दिला असल्याचं म्हटलं आहे.
'आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक असताना जर आम्हाला गद्दार ठरवले जाणार असेल तर गद्दारीची व्याख्या सविस्तरपणे मांडली जावी.' अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
'मी गद्दारी केली नाही, राजीनामा देणार नाही'
कल्याण पश्चिमेच्या आमदार पदावर असताना देखील भोईर यांनाच शहरप्रमुख म्हणून कायम ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता झालेल्या घडामोडीनंतर या पदाचा राजीनामा देणार का? या प्रश्नावर उत्तर देताना भोईर म्हणाले की, 'मी गद्दारी केली नाही, मी राजीनामा देणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. त्यांना वाटलं तर ते मला कायम ठेवतील नाहीतर काढून टाकतील. तो त्यांचा विषय आहे.'
अधिक वाचा: 'फडणवीस,शिंदेंसारखी ढोंगी लोकं नाहीत', राऊतांची घणाघाती टीका
'दि. बा. पाटील नामकरणाचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घाईघाईत घेतला'
दरम्यान, याचवेळी दि. बा. पाटील विमानतळ नामकरणाबाबत देखील आमदार भोईर यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं की,'तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरुन उतरताना घाईघाईने निर्णय घेतल होता. मुळात त्यावेळी जी मंत्रिमंडळ बैठक झाली होती ती वैध होती की नाही हा निर्णय बाकी असताना त्याबाबत अधिक काही बोलता येणार नाही.'
यामुळे या निर्णयाला रीतसर मान्यता देण्यासाठी नव्या मंत्री मंडळाने स्थगितीचा निर्णय घेतला असावा. मात्र आगरी समाजाचा आमदार म्हणून विमानतळाला दि. बा. यांचेच नाव असावे यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा: 'दिघेंवर सिनेमा बनवला, तोही आवडला नाही', शिंदेंचा गौप्यस्फोट
...म्हणून आम्ही बंड केलं!
'राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर जायला नको यासाठी आमचा पहिलाच विरोध होता. मात्र मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख विराजमान होणार म्हणून आम्ही माघार घेतली होती. पण आता महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडलो म्हणून आम्हाला गद्दार ठरवत असेल तर गद्दारींची व्याख्या काय आहे ती जाहीर करावी. मी मंत्रिपदाबद्दल काही सांगितलेलं नाही, एकनाथ शिंदेंना वाटलं तर मंत्रिपद देतील.' असं भोईर यावेळी म्हणाले.
विश्वनाथ भोईर का आहेत ठामपणे शिंदेंच्या पाठिशी?
एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं त्या बंडात सुरुवातीपासूनच विश्वनाथ भोईर हे ठामपणे सोबत आहेत. याचं कारण हे आपल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतं. २०१९ साली भाजप आणि शिवसेनेने युतीत निवडणूक लढवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे नरेंद्र पवार कल्याण पश्चिम मतदारसंघात निवडून आले होते.
अधिक वाचा: 'राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय?'
दरम्यान, २०१९ साली युतीत निवडणूक लढवताना शिवसेनेने कल्याण मतदारसंघ आपल्यालाच मिळायला हवा अशी भाजपसमोर ठेवली. त्यावेळी भाजपने देखील शिवसेनेची ही अट मान्य करुन आपल्या विद्यमान आमदाराला तिकिट नाकारलं. खरं म्हणजे या मतदारासंघासाठी एकनाथ शिंदे हेच आग्रही होते.
भाजपने हा मतदारसंघ सोडल्यानंतर शिवसेना नेतृत्वाच्या मनात वरुण सरदेसाई यांना या मतदासंघातून तिकीट द्यावं असं होतं. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपलं संपूर्ण वजन वापरून विश्वनाथ भोईर यांना अगदी शेवटच्या क्षणी तिकीट मिळवून दिलं होतं. याच एका गोष्टीमुळे विश्वनाथ भोईर हे पहिल्यापासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.