मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत हे अद्यापही मुख्यमंत्री शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात सातत्याने टीकेचे बाण सोडत आहेत. आज (१३ जुलै) माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. गुरुपौर्णिमेबाबत बोलत असताना देखील राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केली.
'काही लोकं हे जी बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यातून बाहेर गेले आहेत आणि आता म्हणतात की, बाळासाहेब आमचे गुरु आहेत. आज जर बाळासाहेब हयात असते तर त्यांनी या लोकांना खास आपल्या स्टाइलने उत्तर दिलं असतं.' असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेवर तोफ डागली.
'बाळासाहेबांनी सर्व काही दिलं. गुरु हा मोकळ्या हाताने देत असतो. तसं बाळासाहेबांनी मोकळ्या मनाने, मोकळ्या हाताने उधळण केली. असा गुरु होणे नाही. ते महाराष्ट्राचे, देशाचे गुरु होते एका अर्थाने.'
'आता काही लोकांनी शिवसेनेच्या बाहेर जाऊन. जी बाळासाहेबांची शिवसेना त्याच्या बाहेर गेले आणि म्हणतात बाळासाहेब आमचे गुरु. आज बाळासाहेब हयात असते त्यांनी त्याच्यावर काय भाष्य केलं असतं हे समजून घेण्यासारखं आहे.' अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.
'बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही', अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. एकनाथ शिंदे यांच्या याच ट्विटनंतर त्यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शिवसेनेत आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश द्यायचे आणि इतरांनी ते ऐकायचे तसेच पाळायचे अशी पद्धत होती. इतर पक्षांमध्ये असते तशी सर्वाधिकार अमूक एका नेत्याला दिल्याचे जाहीर करणे असा प्रकार शिवसेनेत कधीही नव्हता. आदेश पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने द्यायचा आणि इतरांनी तो अंमलात आणायची अशी व्यवस्था होती. पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी 'शिवसैनिकांच्या आग्रहामुळे' असे कारण देत यशवंत सिन्हा यांच्या ऐवजी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणवून घेत आहेत. याच भूमिकेवर ठाम राहून एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादनाचे ट्वीट केले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.