भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत, पवारांच्या पक्षाकडून मोठी खेळी 

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 22:54 IST

जर भाजप सरकार बनवत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात मतदान करेल आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एक पर्यायी सरकार देईल. असं वक्तव्य राष्ट्रवादीचया नवाब मलिक यांनी केलं आहे.

if the bjp is forming a government the ncp will vote against them and make an alternative governmen
भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत, पवारांच्या पक्षाकडून मोठी खेळी   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राज्यपालांकडून आमंत्रण मिळाल्यानंतर भाजपची सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाल
  • भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचीही मोठी खेळी
  • राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर आता प्रचंड वेगाने राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरु केलेले असताना दुसरीकडे आता भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'जर भाजपने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याविरोधात मतदान करु.' असं थेट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यामुळे आता भाजपला सत्ता मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व प्रयत्न करणार असल्याचं दिसतं आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मात्र राष्ट्रवादी मदत करण्याचे असल्याचे संकेतही दिले जात आहे. 

पाहा नवाब मलिक नेमकं काय म्हणाले:

'घोडेबाजार सुरु होऊ नये याची खातरजमा करण्याची जबाबदारी राज्यापालांची आहे. जर भाजप सरकार बनवत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी एक पर्यायी सरकार आम्ही निर्माण करु.' असं म्हणत नवाब मलिक यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. 

'शिवसेनेशी मनोमिलन २४ सेकंदात शक्य'

दरम्यान, असं असलं तरी शिवसेनेशी मनोमिलन २४ सेकंदात शक्य आहे. असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार. 

'उद्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे, आम्ही संर्वंकष चर्चा करणार आहोत. शिवसेनेशी एकजूट ही २४ सेकंदात होऊ शकते. शिवसेनेने मतरुपी जनादेशाचा सन्मान करत चर्चा करावी. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की २४ तास आमची चर्चा करण्याची तयारी आहे. युती आजही आमची कायम आहे. त्यामुळेच केंद्राच्या मंत्रीमंडळात आजही शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यामुळे आमचा प्रेमाचा संबंध कुठेही तुटलेला नाही. जो काही आग्रह आहे, या संदर्भात शिवसेनेने फेर विचार करावा अशी भाजपची अपेक्षा आहे. असं  मुनगंटीवार यावेळी म्हणाले. 

राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनचं निमंत्रण  

विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाला बहुमत मिळालं नाही. मात्र, १०५ जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे आता राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष या नियमानुसार भाजपला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. अशावेळी भाजप सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला राजी करणार की, दुसरे कोणते पर्याय वापरणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ही मागणी शिवसेनेने कायम ठेवली आहे. त्यामुळे आता भाजप एक पाऊल मागे जाऊन ही मागणी मान्य करुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करणार का? अशीच सध्या राजकीय स्तरावर चर्चा आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल थेट पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले. त्यामुळे या दोन्ही पक्षातील संबंध टोकाला पोहचले आहेत. पण असं असताना देखील दोन्ही नेत्यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की, चर्चेची दारं खुली आहेत. त्यामुळेच आता भाजप काय निर्णय घेतं यावर संपूर्ण सत्तास्थापनेचं गणित अवलंबून असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...