मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर आमदारांना (MLA) केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला जबरदस्त झटका बसला आहे. आज सकाळी गुवाहाटीला पोहचल्यानंतर शिंदे अनेकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. आपल्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. परंतु या बंडाची धगधग शिवसंपर्क अभियानात लागली होती अशी माहिती आता समोर आली आहे.
फेब्रुवारीतील विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या नाराजीचा कडेलोट झाला होता. महाविकास आघाडीविरोधात आणि त्यातही राष्ट्रवादीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त झाल्याने शिवसेनेतील बंडाचे संकेत मिळाले होते. याच नाराजीचा स्फोट राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर आता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात या शिवसंपर्क अभियानाच्या बैठकांवेळी शिवसेना आमदारांच्या नाराजीचा भडका उडाला. नेत्यांसमोर नाराजीचा पाढा वाचून शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी थांबले नाहीत तर महाविकास आघाडी पक्षाच्या मुळावर येत असल्याचा इशाराही काही जणांनी दिला. शिवसेनेत आतल्या आत मोठ्या प्रमाणात खदखद असून त्याचा कधीही स्फोट होईल असे संकेत त्या अभियानात मिळाले होते. महाविकास आघाडीऐवजी भाजपबरोबर युती करावी, अशी शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांची भूमिका आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना बंडाचा आज नवा अध्याय सुरू झाला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना रात्रीत गुजरातहून गुवाहाटीला नेण्यात आलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचं केंद्र आता गुजरातमधून आसामच्या गुवाहाटीत गेले आहे. शिवसेनेच्या गुजरातमधून आमदारांना रात्री तीन वाजता सूरतहून गुवाहाटीकडे नेण्यात आले आहे. शिवसेना आमदारांसाठी २ चार्टर्ड विमान तैनात केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह सूरतहून आता शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदारसोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही एकनाथ शिंदे यांच्यासह आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईही एकनाथ शिंदे यांच्यासह दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे वेगळा गट स्थापन करणार आहेत. तसे ते आज राज्यपाल यांना पत्र देणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.