राज्यातल्या लॉकडाऊन संदर्भात राजेश टोपेंनी दिले 'हे' संकेत

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 04, 2020 | 10:52 IST

राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा चढता क्रम पाहून आरोग्यमंत्री राजेश टोपे यासंदर्भात मोठे संकेत दिलेत. राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे.

Rajesh Tope
राज्यातल्या लॉकडाऊन संदर्भात राजेश टोपेंनी दिले 'हे' संकेत  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं लॉकडाऊन येत्या 14 एप्रिलला संपणार आहे. त्यातच देशासह राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसतेय. तसंच राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा चढता क्रम पाहून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यासंदर्भात मोठे संकेत दिलेत. राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. एका वृत्तपत्राच्या वेवसाईटनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. 

विशेषतः खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलं. सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसतोय. 15 एप्रिलपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा असल्याचं टोपे म्हणालेत. आपल्याला लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी असल्याचं मत टोपे यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध राष्ट्रीय लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरही कायम ठेवण्याचे संकेत टोपे यांनी दिलेत. 

देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच आम्ही राज्यामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्याआधीही आम्ही राज्यातील शहरांमध्ये निर्बंध लागू केले होते. अनेक सर्वाजनिक ठिकाणे बंद केली होती. मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं हे कठीण काम आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करुनच घेणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे, असं माझं वैयक्तीक मत असल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात बाधितांची संख्या इतकी
 

राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित 67 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील 43 रुग्ण मुंबई येथील असून 10 रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील 9 तर अहमदनगर जिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे.  याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 490  झाली आहे. शुक्रवारी राज्यात 6 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्येकी 1 रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे  येथील आणि 2 जण मुंबई  येथील आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी