गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका; लस घेतलेल्यांनाही परत होतेय लागण

मुंबई
भरत जाधव
Updated Sep 15, 2021 | 11:34 IST

मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता मुंबई महापालिकेने व्यक्त केली आहे. या महिन्यातील आकडेवारीही तेच दर्शवत आहे.

Disruption' in Mumbai after Ganeshotsav Corona patients at increased risk
गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, बाजारपेठा आणि सार्वजनिक गणेशोत्सवातील होणारी गर्दी.
  • मुंबईमध्ये 23 हजारांहून अधिक व्यक्ती ज्यांनी लस घेतली त्यांना पुन्हा कोरोनाची लागण
  • सप्टेंबर महिन्यात रुग्णांचा आकडा 350 ते 400 पर्यंत पोहोचला.

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता मुंबई महापालिकेने व्यक्त केली आहे. या महिन्यातील आकडेवारीही तेच दर्शवत आहे. कारण मुंबईत ऑगस्ट महिन्यात दररोज 200 ते 300 कोरोना रुग्णांची नोंद केली जात होती. पण सप्टेंबर महिन्यात हा आकडा 350 ते 400 पर्यंत पोहोचला आहे. सगळ्यात मोठी चिंता म्हणजे, लस घेतलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये 23 हजारांहून अधिक व्यक्ती ज्यांनी लस घेतली त्यांना पुन्हा कोरोना झाल्याचे माहिती मिळाली आहे.

अशातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचं महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आरतीच्या वेळी अनेक नागरिक एकत्र येतात आणि मास्कशिवाय आरतीसाठी सहभागी होत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढणार असल्याचं, महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 

गेल्या वर्षी याच महिन्यातील चित्र मुंबईसाठी अत्यंत भयावह होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. अशातच दुसऱ्या लाटेदरम्यान, मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या ही गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाच्या नंतरच्या काळात पाहायला मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर मुंबई महापालिका बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही रुग्णसंख्या जवळपास 350 ते 360 रुग्णांवर आली आहे. पण गणेशोत्सवाच्या काळात वाढलेली गर्दी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.  

मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि दुसरे म्हणजे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये वाढणारी गर्दी. याठिकाणी नियमांचे पालन होतंय का? याकडे पालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. तरी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. अशातच विसर्जन मिरवणूकींचे काय करायचं? हा प्रश्न सध्या महापालिकेसमोर आहे. 

लस घेतलेल्यानंतर निष्काळजीपणा करू नका 

मुंबईत 23,239  लसवंतांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोस घेऊनही 9,000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 14,239 इतकी आहे. मुख्य म्हणजे, लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण हे 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे.

18 ते 44 वयोगटात

पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- 4420
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 1835 

45 ते 59 वयोगट

पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- 4815
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 2687

60 वर्षांवरील

पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण-5004
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 4479

तर दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांमध्ये एकंही लस न घेतलेल्या दोन तृतीयांश लोकांना आयसीयूमध्ये भरती करण्याची वेळ आली. यामध्ये यापैकी 93 टक्के लोके म्हणजेच 576 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत केलेल्या अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर लस किती अत्यावश्यक आहे हे लक्षात येईल. 

 काल (मंगळवारी) दिवसभरात 365 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत काल (मंगळवारी) दिवसभरात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,12,570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी