'म्हणून अजूनही मंत्र्यांचा शपथविधी होत नाही', राऊतांनी सांगितलं नेमकं कारण

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 14, 2022 | 13:06 IST

राज्यात शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी पार पडून १३ दिवस उलटले आहेत. असं असतानाही राज्य वाऱ्यावर आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

it has been 13 days since shinde fadnavis took oath but still swearing in ceremony of ministers is not taking place sanjay raut told real reason
'म्हणून अजूनही मंत्र्यांचा शपथविधी होत नाही', राऊतांनी सांगितलं नेमकं कारण  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतली होती. आता त्यांच्या शपथविधीला १३ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, त्यानंतर एकाही मंत्र्याचा अद्याप शपथविधी झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळातील सर्वच खात्यांचा कारभार हा फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच पाहावा लागत आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

'काही आमदार हे एका गटामध्ये गेले आहेत. ते अपात्र ठरु शकतात. त्यामुळे ज्यांच्यावर अपात्रतेची जी टांगती तलवार आहे त्यामुळे मंत्रिपदाची शपथ देणं हे घटनाबाह्य कृत्य आहे. या सगळ्याची भीती असल्यामुळे अजूनही शपथ घेण्यापासून त्यांना रोखलं गेललं आहे.' असं संजय राऊत हे यावेळी म्हणाले. 

अधिक वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत,कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश

पाहा संजय राऊत नेमकं काय-काय म्हणाले: 

१३ दिवस उलटून गेले तरी राज्याला मंत्रिमंडळ नाही! 

'१०० च्या आसपास लोकं महापुरात वाहून गेले आहेत. मृत्यू पावले आहेत. १०० पर्यंत आकडा गेला आहे मृतांचा. महाराष्ट्रातील अनेक भागात कॉलराचं थैमान आहे. इथेही लोकं मृत्यूमुखी पडत आहेत. अशावेळी राज्यात सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री असणं किंवा उपमुख्यमंत्री असणं म्हणजे सरकार आलं असं होत नाही. १३ दिवस उलटून गेले पण सरकार का स्थापन होत नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात सुनावणी ठेवली आहे.' असं संजय राऊत म्हणाले.

अधिक वाचा: गुरुपौर्णिमेच्या दिवशी CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

'यामधील अनेक आमदार हे एका गटामध्ये गेले आहेत. ते अपात्र ठरु शकतात. त्यामुळे ज्यांच्यावर अपात्रतेची जी तलवार आहे त्यांना मंत्रिपदाची शपथ देणं हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजद्रोह आहे.' असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

'या सगळ्याची भीती असल्यामुळे अजूनही शपथ घेण्यापासून त्यांना रोखलं गेललं आहे. राज्यपालांनी अशाप्रकारचं कोणतंही घटनाद्रोही कृत्य करु नये. अशाप्रकारचं पत्र शिवसेनेकडून राज्यपालांना गेलं आहे. घटनेचं पालन आता तरी करा. कालपर्यंत केलं नाही, यापुढे करा.' असा सल्लाच संजय राऊतांनी राज्यपालांना दिला आहे.  

अधिक वाचा: 'आज बाळासाहेब असते तर...', राऊतांनी सुनावलं!

'आता राज्यपाल कुठे आहेत आमचे? सरकार अस्तित्वात नाही, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, महापूर आहे. कुठे आहेत राज्यपाल आमचे? जे कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते. आता करा मार्गदर्शन. आता गरज आहे या राज्याला आपल्या मार्गदर्शनाची.' असा टोमणाच संजय राऊत यांनी लगावला आहे.

'गद्दार हा शब्द तर इतिहास काळापासून वापरला जातोय'

'काही शब्दांवर बंदी घालण्याची वेळ या सरकारवर का आली? हे पाहावं लागेल कारण बहुतेक हे सगळे शब्द सध्याच्या सरकारविरुद्ध भविष्यात वापरले जाऊ शकतात या भीतीतून हे झालं आहे का?' 

'आता गद्दार हा शब्द हा काही असंसदीय नाही. इतिहास काळापासून गद्दार हा शब्द वापरला जातो. भ्रष्ट हा शब्द वापरला नाही तर देशातील भ्रष्टाचार पूर्णपणे संपलाय का? मग विधीमंडळ असेल, संसद असेल. जर भष्ट्राचार झाला असेल आणि इथे हा शब्द उच्चारायचा नाही तर ही कुठली हुकूमशाही?' असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. 

'..म्हणून उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांना दिला पाठिंबा'

'या देशात पहिल्यांदा एक आदिवासी महिला देशातील सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या काही संवेदना आहेत. महाराष्ट्रात देखील आमचे अनेक खासदार, आमदार आणि कार्यकर्ते जे आदिवासी क्षेत्रात काम करतात. त्यांची देखील हीच भावना आहे आणि त्यामुळेच उद्धवजींनी निर्णय घेतला की, पक्ष आपलं मत द्रौपदी मुर्मू यांना देईल.' 

अधिक वाचा: 'व्हिडीओग्राफीपुरती धावाधाव करु नका', सामनातून टोमणा

मी असे मानतो की, राजकारणाच्या वर जाऊन पक्षाने हा निर्णय घेतला आहे. हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीही आम्ही राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस उमेदवारांना देखील पाठिंबा दिला होता.' असं संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी