... म्हणून गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांना दिलं, जयंत पाटील यांनी केला खुलासा 

मुंबई
Updated Jan 06, 2020 | 20:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra portfolio: Anil Deshmukh gets Home Ministry: राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याना अखेर खातेवाटप करण्यात आलं आहे. या खातेवाटपात गृहमंत्रिपद हे राष्ट्रवादीला मिळालं आहे. 

jayant patil anil deshmukh home ministry maharashtra government ncp sharad pawar decide vidharbha leader marathi news
... म्हणून गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांना दिलं, जयंत पाटील यांनी केला खुलासा  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता अखेर खातेवाटपही जाहीर झालं आहे. या खातेवाटपात गृहमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले आहे. खातेवाटपापूर्वी गृहमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयं पाटील यांना मिळेल अशी चर्चा होती. मात्र, गृहमंत्रिपदाची माळ अनिल देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. गृहमंत्रिपदाची जबाबदारी ही अनिल देशमुख यांच्यावर देण्यामागच्या गारणाचा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. 

काय म्हणाले जयंत पाटील?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी म्हटलं की, "गृहखातं सांभाळायला मला काहीही अडचण नव्हती. परंतू आमच्या पक्षांनी जाणीवपूर्वक विदर्भातील नेत्यांना ही जबाबदारी दिली आहे. विदर्भात आमचा पक्ष अधिक वाढावा आणि विदर्भातील असंख्य कार्यकर्ते आमच्या पक्षाचं समर्थन करतात आमच्या दृष्टीने तेही कार्यकर्ते, नेते आमच्यासाठी महत्वाचे आहेत अशी भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनिल देशमुख ज्यांना माझ्यापेक्षा जास्त काळ मंत्रिपदाचा अनुभव आहे अशा ज्येष्ठ नेत्याला गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे".

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर गृहमंत्रिपद हे शिवसेनेकडे होतं. मात्र, नंतर खातेबदल करुन गृहमंत्रालय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पण शरद पवारांनी हे खातं अनिल देशमुख यांना देण्याचा निर्णय घेतला. 

अनिल देशमुख यांचा परिचय...

अनिल देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अनिल देशमुख यांनी १९९५ साली अपक्ष निवडणूक लढवली होती. याच काळात युती सरकारमध्ये त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९, २००४ आणि २००९ साली त्यांनी पुन्हा याच जागेवर विजय मिळवला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी