उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, जितेंद्र आव्हाडांचा जोरदार पलटवार

मुंबई
पूजा विचारे
Updated Jan 14, 2020 | 18:05 IST

भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यत्तर देऊन राजेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

jitendra awhad and sharad pawar
उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, जितेंद्र आव्हाडांचा जोरदार पलटवार  |  फोटो सौजन्य: Facebook

भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली.  अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यत्तर देऊन राजेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून जितेंद्र आव्हाडांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर केलं आहे. शरद पवार यांची करंगळी पकडून अनेकजण राजकारणात आले. अनेकजण त्यांच्यावर टीका करुन राजकारणात प्रस्थापित झाले. होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न,  प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच, असं आव्हाड म्हणालेत. 

पुढे ते म्हणातात की,  महिलांना 30 टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी...असे किती प्रकल्प सांगू,  त्यामुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक योगदान हे शरद पवार यांचच आहे. तसंच कोण काय बोलतंय याकडे फार लक्ष देण्याची गरज नसल्याचंही आव्हाड म्हणालेत. 

यावेळी उदयनराजेंनी 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावर जोरदार टीका केली. पण याचवेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'शिवसेनेने पक्षाचं नाव ठेवताना वंशजांची परवानगी घेतली होती का? शिवसेनेने शिव काढून ठाकरे सेना असं नाव ठेवावं.' असं म्हणत उदयनराजे यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं.  

उदयनराजे भोसले यांच्या पुण्यात पत्रकार परिषदतेली महत्त्वाचे मुद्दे: 

 1. सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो 
 2. आज पानिपतचा शौर्य दिवस आहे. त्या लढाईत जे कामी आले त्यांना आदरांजली वाहतो. 
 3. सर्वांना संक्रातीच्या शुभेच्छा देतो. 
 4. आजची पत्रकार परिषद घेण्यामागची भूमिका एवढीच आहे की,  कुठलं राजकारण नाही किंवा कधीही केलं नाही आणि करणार ही नाही.  
 5. वाईट वाटतं. ज्या शिवाजी महाराजांकडे केवळ महाराष्ट्र सोडा, देश सोडा संपूर्ण जग म्हणून आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. 
 6. त्यांची अनेकदा तुलना या ना त्या मार्गाने कुणाबरोबर केली जाते 
 7. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे की काय? असं वाटतं 
 8. काल पुस्तक जे प्रकाशित झालं ते पाहून वाईट वाटलं 
 9. शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला यावेळी वाईट वाटलं.  
 10. गोयल नावाचा कुणीतरी लेखक होता. त्याने मोदींची तुलना महाराजांशी केली 
 11. जगात असा कुणीही नाही की, ज्याची महाराजांसोबत तुलना होऊ शकते. 
 12. अलीकडच्या काळात जाणता राजा अशी उपमा देतात, जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच होते.  त्यामुळे इतर कुणाला जाणता राजा म्हटलं जातं त्याचा मी निषेध करतो.  
 13. छत्रपती महाराजांची बरोबरी करण्याएवढी उंची कुणाचीही नाही 
 14. शिवाजी महाराजांची प्रतिमा देवाऱ्यात ठेवतो आणि त्यांची मनापासून पूजा करतो 
 15. त्यामुळे तुलना तर सोडा त्यांच्या जवळपास देखील जाऊ शकत नाही. 
 16. आपण जेव्हा आत्मचरित्र वाचतो तेव्हा आपल्याला देखील असं वाटतं की, आपण त्या विचारांचं अनुकरण करावं. पण त्यांच्यासारखं कुणीही होऊ शकत नाही. 
 17. त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान आहे. मागील जन्मात तुमच्यापेक्षा थोडं जास्त पुण्य केलं असेल म्हणून या घरात जन्माला आलो. 
 18. आमच्या घरातील कुणीही राजांच्या नावाचा कधीही गैरवापर केला नाही. 
 19. लोकशाहीतील तुम्ही सर्व जण पत्रकार म्हणून तुमची देखील जबाबदारी आहे. 
 20. प्रत्येक जण म्हणतो, वंशजांना विचारा 
 21. शिवसेना पक्षाला नाव देताना वंशजांना विचारायला आले होते का?  
 22. महाशिवआघाडीतून शिव हे नाव काढलं? सोयीप्रमाणे महाराजांच्या नावाचा वापर करता.  
 23. शिव वडा... अरे शिवाजी महाराजांना काही आदराचं स्थान आहे की नाही... वडा पावला शिवाजी महाराजांचं नाव? 
 24. आपण सर्व जण मुंबईला जाता त्यावेळेस आपण दादरला मोठं शिवसेना भवन पाहतो, या शिवसेना भवनात बाळासाहेबांचा फोटो वर आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा खाली. हे चुकीचं आहे. 
 25. सत्तेसाठी कुणाच्या पुढे आणि मागे पळणारा मी नाही. 
 26. सत्तेच्या मागे कुत्र्यासारखं धावलो नाही
 27. सोयीप्रमाणे शिवाजी महाराजांचं नाव का घेता? हे मी सगळ्या पक्षांना सांगतो 
 28. शेतकरी मरायले लागले आणि यांची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पळवापळवी सुरु होती 
 29. राज्याचा खेळखंडोबा केलाय त्यांनी. हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटतं मला. 
 30. शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना नाव करा.  
 31. शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही बघून घेऊ 
 32. शिव हे नाव काढल्यानंतर आम्ही बघतो किती जण तुमच्या सोबत राहतात ते. 
 33. मला तर खरंच एक कळत नाही शिवाजी महाराजांच्या तीन-तीन जयंती. अजून किती मानहानी करायची महाराजांची हे ठरवून घ्या. 
 34. महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. ते सगळं पाहत आहेत 
 35. स्वार्थाने एकत्र आलेले लोकं फार काळ सोबत राहत नाही. 
 36. जेव्हा यांचा स्वार्थ साध्य होतो तेव्हा ते आपआपल्या मार्गाने निघून जातात. 
 37. मी माणूस आहे, शिवाजी महाराज नाही. माझ्याकडून चूक होत असेल तर तुम्ही मला मित्र या नात्याने सांगा.
 38. राजेशाही असती तर एकालाही मी उपाशी राहू दिला नसता. ही महाराजांची शिकवण. 
 39. शिवाजी महाराजांनी कधीही स्वत:चं घर भरलं नाही.
 40. एकमेव शिवाजी महाराज होते की, ज्यांना रयतेचा राजा ही उपमा देण्यात आली होती. 
 41. कधीतरी आपण आमदार आणि खासदारांना जाब विचारणार आहात की नाही? 
 42. जर यापुढे महाराजांचं नाव काढलं तर त्या हिशोबाने वागा, नाहीतर महाराजांचं नाव घेऊ नका 
 43. जे वंशज म्हणून आमचं नाव घेतात त्यांना समज देतो, परिणाम काय होतील ते सांगता येणार नाही. 
 44. शिवाजी महाराज हे फक्त आमचे नाही तर तुमचे देखील आहेत. 
 45. गलिच्छ राजकारणाचं खापर आमच्यावर फोडू नका.
 46. महाराष्ट्रातील जनतेने विचार केला पाहिजे की, तुम्ही यांच्या हातातली कठपुतळी बनणार आहात का? 
 47. तुमचा वापर होऊ देऊ नका, असं झालं तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. 
 48. फार बोलण्यापेक्षा एकच विनंती करणार आहे. शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी करा
 49. माझे देशा-परदेशातील मित्र मला विचारतात तीन-तीन जयंती कशा साजऱ्या केल्या जातात. 
 50. माझ्यावर काहीही गलिच्छ आरोप करायचे ते करा. 
 51. दुसरं कुणीही स्वत:ला जाणता राजा म्हणत असेल तर ते सहन केलं जाणार नाही 
 52. लोकांच्या प्रति जी भावना आहे ती संपूर्ण भान ठेऊन बोलतो आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी