Shashikant Warishe: "पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणातील खरे सूत्रधार कोण हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहितीये"

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 11, 2023 | 14:16 IST

Journalist Shashikant Warishe : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणानंतर संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. 

Journalist Shashikant Warishe death case sanjay raut said Eknath Shinde Devendra Fadnavis knows who is real mastermind about this
Shashikant Warishe: "पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणातील खरे सूत्रधार कोण हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहितीये" 
थोडं पण कामाचं
  • गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा, हे चिंताजनक - संजय राऊत
  • भाजपच्या सभेला चोवीस तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा काय? - संजय राऊत

Sanjay Raut letter to Devendra Fadnavis about Shashikant Warishe death case: रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे (Journalist Shashikant Warishe) यांच्या दुचाकीला फोर व्हीलरने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्रकार शशिकांत वारीशे हे गंभीर जखमी झाले होते आणि उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. या घटनेप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या मागचे खरे मास्टरमाईंड कोण आहेत हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना माहिती आहेत असाही खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.

काय म्हटलंय संजय राऊत यांनी आपल्या पत्रात?

राज्याचे गृहमंत्री म्हणून ढासळणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा, हे चिंताजनक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. या हत्येस अपघाताचे स्वरूप दिले असले तरी ही हत्याच आहे. पत्रकार वारीशे हे कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीविरुद्ध सातत्याने आवाज उठवत होते. ते याबाबत लिखाण करीत होते व रिफायनरीचे समर्थक म्हणवून घेणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना धमक्या देत होते. रिफायनरीस कोकणातील जनतेचा विरोध आहे. जरी आपले याबाबत वेगळे मत असले तरी स्थानिक जनता या रिफायनरीविरुद्ध संघर्ष करीत आहे व शशिकांत वारिशेसारखे पत्रकार रिफायनरीविरुद्ध लोकांना जागृत करीत होते, हे सत्य नाकारता येणार नाही. त्या वारिशे यांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे. मी खालील दोन गोष्टींकडे अपले लक्ष वेधू इच्छितो.

1) दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी कोकणातील आंगणेवाडी जत्रेत भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत आपण ठासून सांगितले की, नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतेय ते पाहू व आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा काय?

2) महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यानंतर, रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री व त्यांच्या समर्थकांनी " रिफायनरी विरोधकांना सरळ धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्हयातील पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना वापरण्यात आले. शशिकांत वारिशे यांच्यावर देखील पोलीस व इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता व रिफायनरीविरुद्ध भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागतील, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला. आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकांतील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला व वारिशे यांची हत्या झाली, असे आपणास वाटत नाही काय?

'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे.

याआधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी 'ईडी', 'सीबीआय' व पोलीस यंत्रणेचा वापर होत असे, पण आता विरोधकांच्या हत्याच होऊ लागल्या हे चिंताजनक आहे.

कोकणात याआधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर अशा राजकीय हत्या झाल्या व राजकीय दबावामुळे मूळ आरोपी मोकाट राहिले. त्याच खुनी मालिकेत शशिकांत वारिशे यांचे हौतात्म्य जोडले आहे, हे मी आपल्याकडे नमूद करू इच्छितो.

वारिशे यांच्या हत्येचा निषेध मुंबई, दिल्लीसह जगभरातील पत्रकार संघटनांनी केला आहे. पण कोकणातील इतर खुनांप्रमाणे हे प्रकरण दडपले जाईल, अशी भीती असल्यानेच या खुनाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना किमान 50 लाखांचे अर्थसहाय्य सरकारने करावे, अशी विनंती मी करीत आहे.

शशिकांत वारिशे यांच्या खुनाचे प्रकरण आपण गांभीर्याने घ्यावे. मी स्वतः तसेच शिवसेनेतील माझे प्रमुख सहकारी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी लवकरच रत्नागिरी- राजापूर येथे जात आहोत, याची कृपया नोंद घ्यावी.

हे पण वाचा : स्वप्नदोषाच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे ट्राय करा

नेमकं प्रकरण काय? 

राजापूर येथे झालेल्या थार आणि दुचाकी अपघातात जखमी झालेले पत्रकार शशिकांत वारीशे यांचं उपचारादरम्यान निधन झालं. मात्र या अपघातात आता वेगळी बाजू समोर येऊ लागली आहे. थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात 308 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे या पत्रकाराच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.

हे पण वाचा : धीरेंद्र शास्त्री आणि बागेश्वर धामचा पैसा येतो कुठून?

पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीशे यांनी सकाळी टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनर संदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारच्या सुमारास राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत वारीशे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सकाळी त्यांचे निधन झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी