पत्रकारांना फ्रंट लाइन वर्कर्सचा दर्जा देऊन लस द्यावी : धनंजय मुंडेचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

राज्यातील पत्रकार, माध्यम प्रतिनिधींना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन प्राधान्याने लसीकरण करावे - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती

Dhananjay Munde's letter to the Chief Minister
पत्रकारांना फ्रंट लाइन वर्कर्सचा दर्जात लस द्यावी : मुंडे  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • राज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत.
  • या सर्व माध्यम प्रतिनिधींना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे
  • सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे एका पत्राद्वारे केली विनंती

मुंबई : राज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत. या सर्व माध्यम प्रतिनिधींना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी विनंती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे. याबाबत स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

गेल्या एक वर्षांहून अधिक काळ सर्वजण कोरोना महामारीच्या विरोधात लढा देत आहेत. सुरुवातीला प्रयोगशील यंत्रणांचा वापर करून कोरोना संसर्ग थांबवणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे इथपासून ते लसीकरण प्रक्रियेस वेगाने गती देणे, या सर्व प्रक्रियेत राज्य सरकारने मा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी बजावली आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

कोरोनाच्या या लढ्यात राज्य सरकारच्या मदतीला असलेल्या डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस व इतर अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या सर्वांनीच प्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावत या लढ्याला बळकटी दिली आहे. या सर्व कोरोना योध्यांच्या बरोबरीने कोरोना विरुद्धचा लढा आणि परिस्थितीचे वार्तांकन करून ते जनतेपर्यंत पोचविण्यासाठी विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे यांचे वार्ताहर, प्रतिनिधी देखील राज्यभरात आपले कर्तव्य बजावत आहेत. 

राज्यातील विविध माध्यमांनी या परिस्थितीत कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळकट करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे काम देखील देखील हाती घेतले आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूची बाधा होण्याच्या जास्त शक्यता आहेत. 

काही माध्यम प्रतिनिधींना आपले प्राण गमवावे लागले आहेत; या लढ्यात व्यापक लसीकरण हे एक महत्वपूर्ण शस्त्र आपल्या हाती आहे. म्हणूनच राज्यातील सर्व पत्रकार, माध्यम प्रतिनिधींना 'फ्रंट लाईन वर्कर्स'चा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा अशी विनंती धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी