Kasba Chinchwad by election 2023 updates: कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, राज ठाकरे, नाना पटोले यांना फोन करुन उमेदवार न देण्याचं आवाहन केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (4 फेब्रुवारी 2023) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करुन उमेदवार न देता पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यावर त्या जागेवर उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राखण्याचं आवाहन केलं आहे.
हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या आवाहनाला विरोधक आता काय प्रतिसाद देतात हे येत्या काळातच स्पष्ट होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं असलं तरी रविवारी (5 फेब्रुवारी) सकाळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं म्हटलं आहे.
हे पण वाचा : ड्रॅगन फ्रूट खा अन् चमत्कार पहा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक पोस्ट लिहून कसबा पेठ, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे. पाहुयात राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.
जाहीर आवाहन... pic.twitter.com/lDCH44tnk7 — Raj Thackeray (@RajThackeray) February 5, 2023
महाराष्ट्र विधानसभेच्या 2 आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.
हे पण वाचा : अननसाचे औषधी उपयोग, त्वचेची समस्या होईल दूर
भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनाने कसबा पेठ आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.