केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे.

keshari rationcard farmar vidharbh marathwada
केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी 

थोडं पण कामाचं

  • विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ
  • या योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यांकरिता सवलत
  • राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई  : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात विदर्भ व मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना प्रतिमाणसी 5 किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या कालवधीत राज्यातील जनतेला अन्न, धान्य मुबलक व सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध योजना आखल्या जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्याचा निणर्य घेण्यात आला असून  त्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ प्रतिमाणसी पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या दि. 24 जुलै 2015 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या उपरोक्त 14 जिल्ह्यांतील एपीएल  (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना या योजनेद्वारे एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.  या निर्णयामुळे विदर्भ मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी