कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 23, 2022 | 15:05 IST

Know about Milind Narvekar : Know about Milind Narvekar : आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून शिरसाट यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे. पत्रात थेट उल्लेख नसला तरी नाराजी उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी असावी अशी चर्चा आहे.

Know about Milind Narvekar
कोण आहेत मिलिंद नार्वेकर? 
थोडं पण कामाचं
  • कोण आहेत मिलिंद नार्वेकर?
  • आमदार संजय शिरसाट यांनी पत्राच्या माध्यमातून नाराजी जाहीर केली
  • पत्रात थेट उल्लेख नसला तरी नाराजी उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी असावी अशी चर्चा

Know about Milind Narvekar : आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून शिरसाट यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे. पत्रात थेट उल्लेख नसला तरी नाराजी उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी असावी अशी चर्चा आहे. याआधी राज ठाकरे, नारायण राणे यांनीही शिवसेना सोडताना नार्वेकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. आता शिरसाट यांच्या पत्रातूनही तोच नाराजीचा सूर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटता येत नाही, असे पत्रात शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.

'सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नव्हते;' अशी तक्रार शिरसाट यांनी केली आहे. या तक्रारीमुळे पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर कोण हा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे.

मुळात मिलिंद साधा शिवसैनिक होता. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. ९२च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या एरियातला वॉर्ड विभागला. म्हणून नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने मातोश्रीवर पोहोचला. चुणचुणीत, हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा पंचविशीतला मुलगा उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. मिलिंद तेव्हा सुभाष देसाईंचं बोट पकडून सेनेत सक्रिय होत होता. उद्धवनी त्याला विचारलं, फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद पटकन उत्तरला, तुम्ही सांगाल ते.

मातोश्रीवर पडेल ते काम केलं आणि साधारण ९४ सालच्या उत्तरार्धात मिलिंद रितसर उद्धव ठाकरे यांचा पीए बनला. अपॉइण्टमेण्ट घेणं, डायरी ठेवणं, फोन घेणं, दौरे आखणं, व्यवस्था करणं अशी कामं तो करू लागला. पुढे स्मिता आणि राज ठाकरे मातोश्रीतील सत्ताकेंद्राच्या वर्तुळाबाहेर सरकले आणि उद्धवकडे सेनेची अनभिषिक्त सत्ता आली. उद्धव मोठे होत होते आणि मिलिंदही. कधीच कोणत्याही गोष्टीला नाही न म्हणणारा, सांगितलेली गोष्ट काहीही करून पूर्ण करून देणारा, गोड बोलणारा, प्रसंगी स्वत:कडे वाईटपणा घेणारा, लोकांना कटवण्यात चतुर असणारा हा पीए उद्धव यांच्या गळ्यातला ताईत बनला. उद्धव बाळासाहेबांसारखे चोवीस तास लोकांत रमणारे नेते नव्हते. घरात, कुटुंबात आणि आपल्या छंदांत रमणारा हा साधा मध्यमवर्गीय डोक्याचा माणूस. त्यामुळे त्यांच्या अपॉइण्टमेण्ट कार्यकर्त्यांनाच काय पण पदाधिकारी आणि पत्रकारांनाही महाग होत्या. त्यामुळे मिलिंदचं महत्त्व वाढत गेलं. 

आता ५४ वर्षांचे झालेले मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे पीए शिवसेना पक्षाचे सचिव झाले आहेत. उद्धव ठाकरेंना कोण भेटणार आणि कोण भेटणार नाही यावर आजही नार्वेकर यांचेच नियंत्रण असल्याचे चित्र आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यावतीने त्यांच्याशी चर्चा करणाऱ्यांमध्येही मिलिंद नार्वेकर यांचाच समावेश होता. यावरून काही जणांची नाराजी असली तरी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेत नार्वेकर यांचे महत्त्व वाढल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी