Ajit pawar lashes out in Vidhansabha, मुंबई : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. मात्र सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आज पुन्हा सहा पैकी केवळ एका लक्षवेधीवर सभागृहात चर्चा झाली, इतर लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली. मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रुद्रावतार सभागृहाने अनुभवला.
अधिक वाचा : Maharashtra Pension Issue : पेन्शनप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली 'ही' घोषणा
मंत्री व्हायला पुढे-पुढे करता मग सभागृहात का उपस्थित रहात नाही असा सवाल करुन मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात कोणताच रस नाही, विधीमंडळाची गरीमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच संसदीय कार्यमंत्री सुध्दा सभागृहात कायमच अनुपस्थित असतात, त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्यांनी केला.
विरेोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यासाठी हे अधिवेश अत्यंत महत्वाचे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी विधीमंडळ सभागृह व्यवस्थित चालण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सभागृहाची प्रथा, परंपंरा मोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात प्रश्न मांडत असतात, मात्र त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात उपस्थित राहतच नाहीत. हे वारंवार घडत आहे. त्यामुळे लक्षवेधी सूचना वारंवार पुढे ढकल्याची नामुष्की सभागृहावर येत आहे.
अधिक वाचा : सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली - अंबादास दानवे संतापले
हे सभागृह योग्य प्रकारे चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संसदीय कार्यमंत्री स्वत: अनेकवेळा सभागृहात अनुपस्थित असतात, सभागृहाचे कामकाज करण्यासाठी समन्वय साधण्यात ते कमी पडत आहेत. त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद खाली केले पाहिजे. मंत्रीपद मिळविण्यासाठी अनेक जण लॉबिंग करतात, पुढे-पुढे करतात मग सभागृहात कामकाजाच्यावेळी हे मंत्री अनुपस्थित का राहतात? मंत्र्यांना विधीमंडळात काम करण्यात कोणताही रस नाही, त्यांचा वेगळाच उद्योग सुरु असतो. तसेच सभागृहात अश्वासीत केलेल्या सर्व बैठका सुध्दा होत नाहीत, तरी त्याबैठका सुध्दा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.