विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी ६९.०८ टक्के मतदान

legislative council elections in maharashtra 69.08 percent votes महाराष्ट्रात विधान परिषेदच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान झाले.

legislative council elections in maharashtra 69.08 percent votes
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी ६९.०८ टक्के मतदान 

थोडं पण कामाचं

  • विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी ६९.०८ टक्के मतदान
  • ठाकरे सरकारची प्रतिष्ठा पणाला
  • पाच मतदारसंघांत निवडणूक, एका मतदारसंघात पोटनिवडणूक

मुंबईः महाराष्ट्रात काल (मंगळवार, १ डिसेंबर २०२०) विधान परिषेदच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली. ठाकरे सरकारची (Thackeray Sarkar) प्रतिष्ठा पणाला लागली असताना या निवडणुकीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत  सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान झाले. ही माहिती राज्य सरकारच्या प्रसिद्धी विभागाने दिली. (legislative council elections in maharashtra 69.08 percent votes)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात ६१.०८ टक्के मतदान झाले. पुणे पदवीधर मतदारसंघात ५०.३० टक्के मतदान झाले. नागपूर पदवीधर मतदारसंघात ५४.७६ टक्के मतदान झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघात ८२.९१ टक्के मतदान झाले. पुणे शिक्षक मतदारसंघात ७०.४४ टक्के मतदान झाले. धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात (धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात) ९९.३१ टक्के मतदान झाले. विद्येचे माहेर अशी ओळख मिरवणाऱ्या पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये कमी मतदान झाले. पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. तसेच अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या तुलनेत पुणे शिक्षक मतदारसंघात कमी मतदान झाले.

ठाकरे सरकारची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्रात ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेसाठी निवडणूक झाली. याच कारणामुळे या निवडणुकीत ठाकरे सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याआधी महाराष्ट्राच्या विधान परिषदेसाठी मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे (Shiv Sena) उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे (Congress) राजेश राठोड, भाजपचे (BJP) रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर आणि रणजीतसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

कोरोना संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले आर्थिक प्रश्न हाताळण्यावरुन नागरिक राज्य सरकारवर नाराज आहेत. ही नाराजी निवडणुकीत किती तीव्रतेने उमटली हे निकालातून स्पष्ट होईल. सत्ताधारी नाराजी दूर करुन जास्तीत जास्त जागा जिंकणार की विरोधकांना सरकारचे नाक ठेचण्याची संधी मिळणार हे निकालातून कळेल. 

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने एक, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन आणि काँग्रेसने तीन जागांवर निवडणूक लढवली. भाजपने पूर्ण सामर्थ्यानिशी निवडणूक लढवली. सत्ताधाऱ्यांचे तसेच विरोधकांचे दिग्गज नेते प्रचार करत होते. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप या दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात आहे. 

पाच मतदारसंघांत निवडणूक, एका मतदारसंघात पोटनिवडणूक

अंबरीश पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे धुळे-नंदुरबार येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. बाकीच्या पाच मतदारसंघांसाठीच्या आमदारांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला आहे. कोरोना संकटामुळे या मतदारसंघांसाठी एकत्रितपणे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होत आहे. 

कोणत्या मतदारसंघात कोण आहेत उमेदवार?

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख विरुद्ध राष्ट्रवादीचे अरुण लाड अशी मुख्य लढत आहे. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार शरद पाटील यांच्यासह ६२ उमेदवार इथे रिंगणात आहेत. ही जागा राखण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ताकद पणाला लावली आहे. राष्ट्रवादीकडून जोरदार टक्कर दिली जात आहे. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे संदीप जोशी विरुद्ध काँग्रेसचे अभिजित वंजारी आहेत. अमरावती शिक्षकमध्ये शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे विरुद्ध भाजपचे नितीन धांडे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघांत २७ उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे आमदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपचे शिरीश बोराळकर यांनी त्यांना आव्हान दिले आहे. पुणे शिक्षकमध्ये काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. याबरोबरच धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरिता मतदान झाले.

पवारांच्या बंगल्यावर झाली चर्चा

मतदानाच्या काही तास आधी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर सोमवारी निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेसाठी शिवसेनेकडून संजय राऊत पवारांच्या बंगल्यावर गेले होते. चर्चा संपवून बंगल्याबाहेर आल्यानंतर राऊत यांनी ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी