Aditya Thackeray:'आमच्या नेत्याला वाचविण्यासाठी वाट्टेल ते करु', आदित्य ठाकरेंबाबत शिंदे गटाला आलं प्रेमाचं भरतं!

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 05, 2022 | 21:57 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीबाबत शिंदे गट कोणतीही कारवाई करणार नसल्याचं त्यांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

lets do whatever we want to save our leader said deepak kesarkar shinde group will not take action against aditya thackeray after breaking whip
आदित्य ठाकरेंबाबत शिंदे गटाला आलं प्रेमाचं भरतं!   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • शिंदे गटाला अचानक आलं आदित्य ठाकरेंबाबत प्रेमाचं भरतं
  • शिंदे गट आदित्य ठाकरेंची आमदारकी घालवणार नाही
  • आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते असल्याने शिंदे गट त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचं दीपक केसरकरांनी केलं जाहीर

मुंबई: आपल्या पक्षाच्या प्रमुखाला राज्याच्या सर्वोच्च पदावरुन खाली खेचणाऱ्या शिंदे गटाला (Shind Group) आता मात्र शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुखांचे चिरंजीव आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याबाबत प्रेमाचं अक्षरश: भरतं आलं आहे. कारण की, व्हीप मोडणाऱ्या १४ आमदारांवर कारवाई करु असं म्हणणारा गट आदित्य ठाकरेंवर मात्र अजिबात कारवाई करणार नसल्याचं म्हणत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे ही भूमिका स्पष्ट केली आहे. 

'आम्ही काही कारण देऊ शकतो. आम्ही आमच्या नेत्याला वाचविण्यासाठी वाट्टेल ते करु. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या नेत्याला कसं अडचणीत आणू? ते आमच्या तत्वात बसत नाही. शिंदे साहेबांच्या तत्वात ते अजिबात बसत नाही.' असं म्हणत दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं की, शिंदे गट हे आदित्य ठाकरेंची आमदारकी रद्द व्हावी यासाठी कोणतीही कारवाई करणार नाही. कारण ते त्यांचे नेते आहेत. 

पाहा दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचविण्याबाबत नेमकं काय म्हटलंय: 

'उद्धव ठाकरे हे महान नेते आहेत. ते आमचे नेते आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. पण सकाळी मला एका पत्रकाराने विचारलं की, महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका होतील का? तर मी त्यांना सांगितलं की, जिथे बहुमत असतं तिथे मध्यावधी निवडणुका लागत नाही.' 

'जर त्यांना चाचणी घ्यायची आहे आणि जर त्यांचे जे आमदार आहेत १६-१७ जे नेहमी व्हीपचं उल्लंघन करतात. त्यांच्यावर ट्रायल म्हणून त्या १५ लोकांसाठी निवडणूक लागू शकते.' 

अधिक वाचा: "DCM पद घेण्याची तयारी नव्हती पण.." शपथविधीपूर्वी काय घडलं?

'आमच्या नेत्यांवर आम्हीच कारवाई करावी असं अनेक लोकांचं म्हणणं असतं. ते आमचे नेते आहेत. आम्हीच आमच्या नेत्याला कसं आमदार पदावरुन हटवू. यात काही लॉजिक आहे का? आमचे नेते आहेत आम्ही त्यांना का पदावरुन हटवू. आम्ही काय म्हणणार १५ लोकांना शिस्त लागली पाहिजे. आम्ही थोडंच काही शिकवू शकतो आदित्यजींना. ते आमचे नेते आहेत. पण तुम्ही कसं म्हणता की, १५ लोकांवर कारवाई करणार आणि एकावर करणार नाही. त्यांनी सुद्धा ३० लोकं गैरहजर असताना फक्त १६ लोकांनाच नोटीसा दिल्या ना.' असं म्हणत दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंवर कारवाई केली जाणार नसल्याचं जाहीक केलं. 

'आदित्यजी हे युवासेनेचे नेते आहेत. त्यांचा मान आपण ठेवलाच पाहिजे. तसंच विधानसभेत ते नवीनच आले आहेत. ते आले आणि लगेच मंत्री झाले. त्यामुळे विधानसभेत त्यांनी कामच केलेलं नाही. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना माहित असतील हे मी गृहीत धरत नाही.' अशा प्रकारे दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखणच केली आहे.

'राजकारणाच्या बाबतीत कसं आहे की, जो खाली बसून काम करुन वर जातो त्याला सगळं माहिती असतं. शाखा म्हणजे काय.. लोकांकडे जाणं म्हणजे काय. स्लीप वाटणं, मतदान घेणं म्हणजे काय. हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहिती असतं. नेते फक्त आदेश देतात ना. त्यामुळे त्यांना जे फिडिंग देत आहेत ना ते चुकीचं जात आहे.' अशी टीका दीपक केसरकर यांनी यावेळी केली. 

'आता पण जे काही झालं आहे ना.. ते अशाच चुकीच्या पद्धतीने कान भरल्यामुळे झालं आहे. एवढ्या लोकांची मनं दुखावली. नेत्यापर्यंत कधी गेलंच नाही, उद्धव साहेबांपर्यंत कधी गेलंच नाही. त्याचा परिणाम काय झाला तर ही बंडाळी.' असं म्हणत दीपक केसरकरांनी शिवसेनेतील काही नेत्यांवर निशाणा साधला.

'भुजबळ साहेब बलाढ्य नेते होते. मुख्यमंत्री बनले का.. तर नाही. राणे बलाढ्य नेते होते. मुख्यमंत्री बनले का तर नाही. पण इथे संख्याबळ आहे. घटनेप्रमाणे संख्याबळ आहे. या लोकांना तुम्ही दगा असं म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही लोकांनी तुम्हाला केलंच नव्हतं. लोकांनी महाविकास आघाडीला मतदान कधी केलंच नव्हतं. त्यांनी युतीलाच मतदान केलं होतं आणि आता युतीचंच राज्य आलेलं आहे.' असं दीपक केसरकर म्हणाले

'तुम्ही कोणत्याही आमदाराला माफी देऊ शकता. ती माफी १५ दिवसाच्या आत द्यावी लागते. नियम काय सांगतात तुम्हाल जर अध्यक्षांकडे अर्ज द्यायचा असेल तर त्या सभापतींना नोटीस दिली पाहिजे. पण पक्षाला जर कुठल्याही आमदाराला माफ करायचं असेल तर योग्य कारण देऊन माफी देता येते.' 

'त्यामध्ये आम्ही म्हणू शकतो की, हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. आल्यावर ते थेट मंत्री झाले त्यामुळे त्यांना नियम माहिती नाही. असं आम्ही काही कारण देऊ शकतो. आम्ही आमच्या नेत्याला वाचविण्यासाठी वाट्टेल ते करु. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या नेत्याला कसं अडचणीत आणू? ते आमच्या तत्वात बसत नाही. शिंदे साहेबांच्या तत्वात ते अजिबात बसत नाही.' असं म्हणत शिंदे गट आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात आणणार नाही असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

'आमचं भांडण हे प्रेमाचं भांडण असतं. त्यामुळे प्रेमाने जग जिंकता येतं. हे आम्हाला शिकवलेलं आहे. ते आम्ही कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. तसं प्रेमाने काय जिंकायचं हे तुम्हाला माहिती आहे. जे जिंकायचं आहे ते प्रेमाने जिंकू असं ओरबाडून नाही. आम्ही अतिशय नम्र आहोत आणि प्रार्थना करत आहोत की, आम्ही सगळे एक आहोत आपलं सगळं कुटुंब एक होऊ दे आणि सगळीकडे आनंदीआनंद होऊ दे.' असं एक प्रकारे आवाहनच दीपक केसरकर यांनी केलं असल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी