Eknath Shinde Not Reachable : एकनाथ शिंदेंच्या ‘कमळासना’ची चर्चा, ताज्या पोस्टमध्ये दिसणारं कमळ देतंय वेगळ्या ‘योगा’चे संकेत

मुंबई
अमोल जोशी
Updated Jun 21, 2022 | 10:04 IST

एकनाथ शिंदे यांनी योगदिनाच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कमळाचा वापर करण्यात आला आहे. 'समझनेवालेको इशारा काफी है' अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Eknath Shinde Not Reachable
एकनाथ शिंदेंच्या ‘कमळासना’ची चर्चा  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदेंच्या पोस्टमध्ये दिसतंय कमळ
  • एकनाथ शिंदे कमळाच्या माध्यमातून संदेश देत असल्याची चर्चा
  • शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर

Eknath Shinde Not Reachable |  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे 12 आमदार हे सोमवारी संध्याकाळी नॉट रिचेबल झाले आहेत. ते सध्या सूरत या भाजपच्या बालेकिल्ल्यात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आजच्या योगदिनाचं औचित्य साधत एकनाथ शिंदेंनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा देताना फोटोच्या बॅकग्राउंडला कमळाच्या फुलाचा वापर केला आहे. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल होणं आणि त्यांच्या आजच्या पोस्टमध्ये कमळ दिसणं, याचे फार मोठे राजकीय अर्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

 
#योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग... #जागतिक_योग_दिन #InternationalYogaDay Posted by Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे on Monday, June 20, 2022

सूरतच का?

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील समर्थक आमदारांना घेऊन राज्यात कुठेही जाऊ शकले असते, मात्र ते सूरतलाच का गेले, असा सवालही सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरात राज्यात आपले आमदार घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला असेल, याचीही चर्चा आहे. सूरत हा भाजपचा बालेकिल्ला असून तिथे आपले आमदार सुरक्षित राहतील, अशी रणनिती त्यांनी आखल्याचं सांगितलं जात आहे.

अधिक वाचा - Eknath Shinde Not Reachable : एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार ‘आऊट ऑफ रिच’, विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नवे राजकीय नाट्य, मविआच्या भवितव्याची काळजी

मविआ सरकारला धोका?

एकनाथ शिंदे आणि 12 आमदारांनी शिवसेनेत बंड कऱण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल काय, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. राज्यसभा निवडणूक आणि सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे महाविकास आघाडीची मते फुटली, त्यानुसार भाजपने मविआतील तिन्ही पक्षांच्या पोटात गोळा आणण्याचं काम केलं आहे. फुटलेल्या मतांमध्ये शिवसेनेची 12 मतं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जर का ही मतं भाजपकडे गेली तर अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या साथीनं भाजप सत्तेचा दावा करण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदे दुपारी २ वाजता गुजरातमधून घेणार पत्रकार परिषद

भाजपने जर आपल्याला 145 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आणि तो सिद्ध करून दाखवला, तर मविआ सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागू शकतं. विधान परिषद निवडणुकीतील चित्र पाहता मविआ सरकारला बहुमत सिद्ध कऱणं ही चांगलीच तारेवरची कसरत ठरण्याची शक्यता आहे. 

कमळ ठरतंय चर्चेचा विषय

एकनाथ शिंदे हे सोमवारी विधान परिषदेचं मतदान संपल्यापासून गायब असणं आणि एवढा राजकीय तमाशा झाल्यावरही समोर न येणं यातून शिवसेना फुटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत आता एकनाथ शिंदे काय भूमिका जाहीर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी