Mumbai News: मोठी बातमी! मुंबईतील ८०३ मशिदींना लाऊडस्पीकरची परवानगी, पोलिसांनी दिली माहिती

मुंबई
Updated May 04, 2022 | 09:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

loudspeaker news maharashtra । मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात अग्रस्थानी आहे. मशिदींवरील भोग्यांच्या मुद्द्यावरून मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेपुर खबरदारी घेतली आहे.

Loudspeakers allowed in 803 mosques in Mumbai, police said 
मुंबईतील ८०३ मशिदींना लाऊडस्पीकरची परवानगी, पोलिसांनी दिली माहिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात अग्रस्थानी आहे.
  • मुंबईतील ८०३ मशिदींना लाऊडस्पीकरची परवानगी आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
  • मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

loudspeaker news maharashtra । मुंबई : मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात अग्रस्थानी आहे. मशिदींवरील भोग्यांच्या मुद्द्यावरून मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेपुर खबरदारी घेतली आहे. त्याचाच एक प्रत्यय म्हणजे मुंबईतील सुमारे १,१४४ मशिदींपैकी ८०३ मशिदींनी रितसर अर्ज दाखल करून लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन करून मशिदींना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (Loudspeakers allowed in 803 mosques in Mumbai, police said). 

भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केल्यानंतर मुंबईसह राज्यातील वातावरण तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील सर्व धर्मगुरू, मौलाना यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करण्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून ध्वनिप्रदूषण केल्यास कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो? यामध्ये शिक्षेची तरतूद कोणती? हे देखील धर्मगुरू, मौलवींना विस्तृतपणे सांगण्यात आले. 

... तर कडक कारवाई केली जाईल

दरम्यान, जे धर्मगुरू अथवा मौलाना कायद्याच्या अधीन राहून वागणार नाहीत त्यांच्यावर कायद्यानेच कारवाई केली जाईल, अशी समज मुंबई पोलिसांनी दिली आहे. याचा प्रत्यय मागील काही दिवसांपासून मुंबईत येऊ लागला आहे. कारण ७० टक्क्यांपेक्षा अधिक मशिदींनी पहाटे पाच वाजता होणारी अजान लाऊडस्पीकरवरून करण्यास बंद केले. त्यानंतर काही मशिदींनी लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यास अर्ज केले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यातील ८०३ मशिदींना लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी दिल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

वेळेचे बंधन आणि डेसिबिलची मर्यादा

सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरसाठी सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ दिली आहे. तसेच लोकवस्ती अथवा औद्योगिक परिसर अशा विविध भागांसाठी डेसिबलची मर्यादा लावण्यात आली आहे. लाऊडस्पीकरची परवानगी देताना वेळेचे बंधन आणि डेसिबलची मर्यादा पाळण्याची अट घालण्यात आली आहे. 

राज्यभरात कडक बंदोबस्त

भोंग्याचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मशिदी तसेच इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना विशेष पोलिस संरक्षण पुरविण्यात आले आहे. तसेच समाजमाध्यमांवरही बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक शासन केले जाईल. दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कुणाच्या आवाहनाला बळी पडून कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्नही करू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी