मुंबई: 'मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा बनवला. तोही आवडला नाही.' असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेच होता. मात्र त्यांनी नाव घेणं टाळलं. 'तसंच दिघे साहेबांनी शिवसेना मोठी केली पण त्यांना काय मिळालं?... यावर देखील मी वेळ येईल तेव्हा नक्की बोलेल.' असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुंबईत ते एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे आता शिवसेनेत आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पाहा एकनाथ शिंदे नेमकं काय-काय म्हणाले.
'आनंद दिघेंवर सिनेमा बनवला, तोही आवडला नाही'
'इतिहास घडवला दिघे साहेबांनी. या ठाणे, पालघर जिल्ह्यात शिवसेना एवढी मोठी केली की, घराघरात आजही त्यांचे फोटो आहेत. काय मिळालं त्यांना.. वेळ येईल तेव्हा नक्की बोलेल मी. नक्की बोलेल.. त्यांचा जीवनपट लोकांसमोर उलगडला पाहिजे. त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे म्हणून त्यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आम्ही काढला. तोही आवडला नाही.' असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
अधिक वाचा: 'राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय?'
'तुम्हाला आवडला... पण काही लोकांना पचला नाही. त्याचाही राग होता. पण मी त्याची पर्वा करत नाही. कोणाला आवडो न आवडो परंतु जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी बाळासाहेबांना दैवत मानलं होतं. आम्ही त्यांना तेच मानलं. आज आम्ही बाळासाहेबांचेच विचार घेऊन पुढे चाललो आहोत. धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत.' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
थेट उद्धव ठाकरेंवर टीका
'सरकारमध्ये मुख्यमंत्री आपला असतो त्यावेळेस आपल्या अपेक्षा असतात की, माझी चार कामं झाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. कामं झाली दुसऱ्यांचीच, पक्ष वाढतोय तिसऱ्यांचाच आणि आम्ही गेलो चार नंबरला. अडीच वर्षामध्ये ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्या शिवसैनिकांना काय मिळालं? त्यांचं आयुष्य बदललं? त्यांना कामं मिळाली? त्यांच्या जीवनात बदल घडला? हे तर झालंच नाही पण खोट्या केसेसला सामोरं जावं लागलं. तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख हे माझ्याकडे ओक्साबोक्सी रडत होते.' असं म्हणत आपण का बंड केलं याबाबत एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं.
अधिक वाचा: पुलोद सरकार आणि सध्याच्या सरकारमधील साम्य
'आम्ही आता जे केलं ते बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं आहे. बाळासाहेबांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा आमचा शत्रू आहे. ते म्हणालेले ते माझे शत्रू आहेत. मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही. जेव्हा मला वाटेल असं होतंय तेव्हा मी शिवसेना हे दुकान बंद करेल. हे बाळासाहेबांचे शब्द आहे.' असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
'मी एकदा-दोनदा चार वेळा प्रयत्न केले. आम्ही सांगितलं यांना सोडा हे आपल्याला घातक आहेत. पुढे निवडणूक लढवायची आहे. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांना आपण काय तोंड देणार?' अशी थेट टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
संजय राऊतांवरही शिंदेंनी साधला निशाणा
'आम्ही आता जे केलं ते अडीच वर्षापूर्वीच व्हायला हवं होतं. मला तेव्हाच अनेक जण सांगत होते. की, साहेब हे बदला.. आपल्याला हे खड्ड्यात घालणार, हे घातक आहे. आता आपण बाळासाहेबांचे आदेश मानणारे कार्यकर्ते तीच परंपरा आपण पुढे सुरु ठेवली.'
अधिक वाचा: 'आज बाळासाहेब असते तर...', राऊतांनी सुनावलं!
'सहा महिन्यातच आपल्याला कळू लागलं की, जे आपल्या सोबत आहेत ते आपल्याला बगलेत धरुन मुंडी दाबण्याचा प्रयत्न करुन संपविण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. सुपारी घेतली कोणाची हे तुम्हाला माहित आहे, पक्ष संपवायची.'
'आम्ही घरादारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. जे बोलतायेत त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत याची माहिती काढा. आम्ही जेल भोगले आहेत. ही गद्दारी नाही हा उठाव आहे.. ही क्रांती आहे क्रांती. ही शिवसेना आणि शिवसैनिकाला वाचविण्यासाठी केलेली क्रांती आहे.' असा दावा करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली.
दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे हे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.