Maha Vikas Aghadi organised maha morcha on 17 december: महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यावर एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं, महाराष्ट्रात फुटीरतेची बीज टाकल्याचं पहायला मिळत आहेत. शिवाजी महाराजांचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचं काम सुरू आहे. कर्नाटक सरकार फार आक्रमकतेने आपल्या महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. अक्कलकोट, सोलापूर, सांगलीवर हक्क सांगत आहेत. आपल्या राज्याला सरकार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्रात हिंदूंममध्ये फुट पाडण्याचं विधान करत आहेत.
गुजरातच्या निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्रात येणारे उद्योग यांनी गुजरातमध्ये पळवले. तसेच येत्या काळात कर्नाटकच्या निवडणुका येत आहेत. मग कर्नाटकच्या निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील गावे खरोखर तोडणार आहेत का? मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहेत हे कळणार कधी? आज कर्नाटकात आपले काही मंत्री जाणार हे कळलं होतं पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यावर त्यांचा दौरा रद्द झाला.
महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षातील नेत्यांची बैठक झाली. आमच्या सोबतचे मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत आमचं बोलण झालं आहे. या सर्वांनी एकजूट दाखवण्याची ही योग्य वेळ असल्याचं मान्य केलं. ही एकजूट दाखवण्यासाठी हिवाळी अधिवेशनापूर्वी 17 डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणार आहे. या मोर्चात अगदी भाजपमधील छत्रपती शिवाजी महाराजप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी आहेत, ज्यांना महाराष्ट्राचा झालेला अपमान पटत नाहीये त्यांना सुद्धा मी आमंत्रण देतोय की सर्वांनी या. कारण, हा केवळ राजकीय लढा नाहीये. हा आपल्या राज्याच्या स्वभिमानाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ना भूतो ना भविष्यती असा मोर्चा आम्ही काढण्याचं आम्ही ठरवलं आहे. हा मोर्चा केवळ राज्यपालांना हटवा यासाठी नाहीये तर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्या सर्वांच्या विरोधात असणार आहे. हा मोर्चा ही एक सुरुवात असणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.